वर्धा - कोरोना संसर्ग टाळला जावा म्हणून 'घरात राहा, कोरोना योद्धा व्हा!' या नव्या संकल्पनेला वर्ध्यात सुरुवात करण्यात आली. गृह विलगिकरणात असणाऱ्यांनी बाहेर न पडता घरात राहून कोरोनाच्या लढ्यात प्रशासनाला सहकार्य करण्याचे, आवाहन जिल्हाधिकारी विवेक भीमनवार यांनी या माध्यमातून केले आहे.
घरात राहणाऱ्यांनी रस्त्यावर येऊ नये, यासाठी जिल्हा प्रशासन जनजागृती करत आहे. तरीही गृह विलगिकरणात असणारे काही लोक बाहेर पडत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे प्रशासनाने एका नवीन संकल्पनेला सोमवारपासून सुरुवात केली. विशेषकरून पुणे-मुंबई यासारख्या रेड झोनमधून येणाऱ्या नागरिकांनी संपूर्ण कुटुंबासह होम क्वॉरंटाईन रहावे. या 14 दिवसांत कुठल्याही कामासाठी बाहेर पडू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
घरात राहणाऱ्यांनीही इतर सदस्यांसोबत अधिक संपर्कात येण्याचे टाळावे. सोमवारी बाहेरून आलेल्या 7 हजार 312 नागरिकांना जिल्हाधिकाऱ्यांसह खासदार, आमदार आणि इतर लोकप्रतिनिधींनी 'घरी राहा, कोरोना योद्धा व्हा' असे आवाहन केले.
जिल्हाधिकरी विवेक भीमनवार यांच्या नेतृत्वात, पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, मुख्य कार्यपालन अधिकारी सचिन ओंबासे यांनी शहरातील नागरिकांची भेट घेतली. या अभियानात खासदार रामदास तडस, जिल्हा परिषद अध्यक्षा सरिता गाखरे, आमदार पंकज भोयर, आमदार समीर कुणावार यांनीही सहभागी होत जनजागृती केली. नगर परिषद अध्यक्ष अतुल तराळे, प्रेम बसंतानी, प्रशांत सव्वालाखे, तीनही उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे, हरीश धार्मिक, चंद्रभान खंडाईत, सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, सर्व तहसीलदार, नायब तहसीलदार, कृषी अधिकारी, पंचायत समिती गट विकास अधिकारी, जिल्हा परिषद सभापती व सदस्य, पंचायत समिती सभापती व सदस्य, रोटरी सदस्य, रेड क्रॉस सोसायटीचे सदस्य, यांनीही सहभाग घेत 7 हजार कुटुंबांना एकाच दिवशी भेटी दिल्या.
नागरिकांना घरी राहा कोरोना योद्धा व्हा! असे जिल्हाधिकारी यांच्या सहीचे पत्र देण्यात आले. या पत्रात गृह विलगिकरणातील व्यक्तींनी घरातच राहून स्वतःचे आयुष्य सुरक्षित ठेवण्यासोबतच सामाजिक सुरक्षितता जपण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच कोरोनाच्या युद्धात प्रत्यक्ष काम करणाऱ्या कोरोना योद्ध्यांप्रमाणेच आपले घरी राहणे सुद्धा महत्त्वाचे ठरणार आहे. त्यामुळे कोरोनाच्या लढाईतील आपणही एक सैनिक व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.