वर्धा - दरवर्षीच बियाणाच्या दरांमध्ये वाढ होते. मात्र यावर्षी सोयाबीनच्या बियाणाची किंमत आभाळाला भिडली आहे. यामुळे शेतकऱ्यांना उत्पादन खर्च भरून काढण्यास अडचणी येत आहेत. सध्या क्विंटलमागे पाचशे ते आठशे रुपयांपर्यंतची भाववाढ करण्यात आल्याने बियाणे विकत घेण्यासाठी अतिरिक्त आर्थिक तरतुद करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.

कंपन्यांनी बाजारातून खरेदी केलेले बियाणे महाग असल्याने त्याचवार प्रक्रिया करून विकताना भरपाई काढण्यात येत असल्याचा माहिती मिळत आहे. यासह बाजारात सोयाबीन कमी असणार यांची जाणीव ठेवून मुद्दाम भाववाढ केल्याची चर्चा आहे. बियाणाची साठवणी करून बाजारात किंमत वाढवण्यात हातभार लावल्याचे काही विक्रेते सांगत आहेत.
लॉकडाऊनचाही परिणाम यावर झाला. किरकोळ विक्रेत्यांमुळे मुख्य वितरणाकडे बियाणांची मागणी नोंदवली जाते. मात्र यावर्षी तशी मागणी विक्रेत्यांनकडून नोंदवली गेली नाही. यासह बाहेरून येणारी आवक देखील यामुळे प्रभावित झाली आहे. त्याचा थेट परीणाम बियाण्याच्या भाववाढीवर झाला. मागील वर्षी १९८० ते २२५० रुपयांपर्यंत मिळणारे सोयाबीनचे बियाणे यंदा २५०० ते २५५० रुपयांच्या घरात पोहोचले आहे.


वेगवेगळ्या कंपनीचे सोयाबीन दर वेग वेगळे
यावर्षी सुरुवातीला २ हजार १५० रुपयांपर्यंत सोयाबीनचे बियाणे विक्रीसाठी होते. आता मात्र तेच बियाणे २५०० ते २५५० पर्यंत रुपये पोहोचले आहे. रिसर्च व्हरायटीचे बियाणे मागील वर्षी २३०० ते २४०० रुपयांपर्यंत होते. यावर्षी हे बियाणे २६०० ते २७०० रुपयांपर्यंत पोहोचले आहे. एका पोत्यात ३० किलो बियाणे असते.

शेतीतील खर्च कमी करण्यासाठी संकरीत बियाणांचा वापर करणे आवश्यक असल्याचे शेती अभ्यासक विजय जावंधिया यांनी सांगितले. यात सुरुवातीपासून नियोजन करावे लागते. मात्र, उत्पन्न चांगल्या प्रतीचे येते. चांगले बियाणे असल्यास ते काढून ठेवावे. जास्त शेंगा असलेल्या झाडाचे बियाणे वेगळे काढावे, शास्त्रशुद्ध पद्धतीचा अवलंब करून किंवा दोन-तीन वर्षांतून एकदा चांगले बियाणे आणून तयार करण्याचा सल्ला जावंधिया यांनी दिलाय.