वर्धा - वर्ध्यातील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या आयसोलेशन वॉर्डमधील 16 जणांना गुरुवारी उपाशी राहावे लागले. जिल्हा सामान्य रुग्णालयात पिपरी मेघे परिसरातील कोरोनाबाधित व्यक्तीच्या कुटुंबाच्या संपर्कातील 16 लोकांना विलगीकरणासाठी आणण्यात आले. त्यांची नोंदणी करून घेण्याच्या प्रक्रियेत लागलेल्या कालावधीमुळे त्यांना दिवसभर उपाशीच राहावे लागले.
वर्ध्याच्या पिपरी येथील एका कुटुंबात कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. विवाह सोहळ्यातून ही बाधा झाली आहे. यामुळे या कुटुंबाच्या निकट संपर्कातील 16 जणांना सामान्य रुग्णालयाच्या आयसोलेशन कक्षात आणण्यात आले. त्यानंतर त्यांचे स्वॅब घेऊन त्यांची नोंद करून घेण्यासाठी जवळपास 1 वाजले. त्यांनतर त्यांना आयसोलेशनमध्ये नेण्यात आले. पण रुग्णालय प्रशासनाच्या वेळेनुसार त्यांना उशीर झाला असल्याने त्यांना जेवण मिळू शकले नाही.
जेव्हा भूक लागल्याने काहीच खायला दिले नसल्याने ओरड सुरू झाली, तेव्हा मात्र चार वाजताच्या सुमारास त्या कुटुंबियांना चहा आणि बिस्किट देण्यात आले. यानंतर त्यांना रात्री जेवण देण्यात आले. त्यामुळे गुरुवारचा उपास घडवण्याचा प्रकार आयसोलेटेड रुग्णांसोबत घडला. हा प्रकार चुकीचा असल्याचे म्हणत आयसोलेशनमध्ये असलेल्या कुटुंबीयांनी रोष व्यक्त केला. यापूर्वीही जेवण निकृष्ट देण्याचा प्रकार उघडकीस आला होता. यामुळे याकडे आरोग्य विभागाने लक्ष देणे गरजेचे असल्याचे बोलले जात आहे.
येथे जेवण वेळेवरच दिल जाते, त्यांना आणणाऱ्यांनी जबाबदारी पूर्ण करायला पाहिजे होती. यात नेमके काय झाले याची चौकशी करत कारणे दाखवा नोटीस देण्यात येईल. यापुढे अधिक काळजी घेतली जाईल, असेही जिल्हा शल्य चिकित्सक डॉ पुरुषोत्त मडावी यांनी ईटीव्ही भारताला सांगितले.