वर्धा - पुलगाव-वर्धा महामार्गावरील मलकापूर बोदड जवळ ट्रॅक्टरसह ट्रॉली उलटल्याने अपघात झाला आहे. यामध्ये दोघांचा मृत्यू झाला असून तिसरा गंभीर जखमी आहे.
भरधाव ट्रॅक्टरवरून नियंत्रण सुटल्याने ट्रॉली उलटली; आणि सेंट्रिंग साहित्याखाली दबून दोघांचा मृत्यू झाला आहे. राजू उर्फ शेख रियाज शेख आणि चंद्रभान शेळके अशी मृतांची नावे आहेत. तर सोहेल खान गंभीर जखमी आहे.
संबंधित ट्रॅक्टर पुलगाववरून सेंट्रिंगचे साहित्य घेऊन रात्रीच्या वेळी नागपूरला जात होता. अचानक आलेल्या वाहनामुळे चालकाचे नियंत्रण सुटले. यामुळे ट्रॅक्टरसह ट्रॉली उलटली. नागपूरला एका कंत्राटदाराकडे हे साहित्य पोहोचवत असल्याची माहिती आहे.
यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन दोघांचे मृतदेह शवविच्छेदनसाठी पाठवले आहेत. या अपघातामुळे काही काळ वाहतुकीचा खोळंबा झाला होता.