वर्धा - रुग्णवाहिका मालकाचे एका मुलीशी प्रेमसंबंध असल्याच्या वादातून रुग्णवाहिका पेटवल्याची घटना वर्ध्यात घडली. या घटनेत रुग्णवाहिका चालकावरही चाकूने हल्ला करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. महामार्गावरील साटोडा शिवारात ही घटना आज दुपारी घडली. कुंदन कोकाटे असे रुग्णवाहिका चालकाचे नाव आहे. संघर्ष लोखंडे असे रुग्णवाहिका पेटवणाऱ्याचे नाव आहे.
तन्मय मेश्राम याच्या मालकीची ही रुग्णवाहिका आहे. तन्मयचे एका मुलीशी प्रेमसंबंध असून तो चार दिवसांपासून तिला घेऊन गेल्याचा आरोप संघर्ष लोखंडे याने केला. शुक्रवारी दुपारी रुग्णवाहिका जिल्हा सामान्य रुग्णालयापुढे उभी असताना संघर्ष आपल्या तीन साथीदारांसोबत आला. रुग्णवाहिका चालक कुंदनकडे मालकाविषयी विचारपूस केली. यावेळी त्याने ते कुठे आहेत याबद्दल माहिती नसल्याचे सांगितले.
हेही वाचा - बापरे..! गणेशोत्सवासाठी एकत्र जमलेल्या 40 नातेवाईकांपैकी 32 जणांना कोरोनाची लागण
त्यावेळी रागाच्या भरात संघर्षच्या तीन साथीदारांनी चालक कुंदनला चाकूच्या धाकावर रुग्णवाहिकेत जबरदस्तीने बसवून मारहाण केली. ही रुग्णवाहिका पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून जात असताना कुंदनने हुशारीने चालत्या वाहनातून उडी घेत स्वतःचा बचाव केला. यानंतर तत्काळ शहर पोलिसांना माहिती देत घडलेला प्रकार सांगितला. शहर पोलिसांना माहिती मिळताच रुग्णवाहिकेचा शोध घेतला. ही रुग्णवाहिका साटोडाकडे गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यावेळी पोलीस पोहचण्यापूर्वी रुग्णवाहिकेला पेटवण्यात आले असल्याने ती पूर्णतः जळून खाक झाली होती.
शहर पोलिसांनी या घटनेची नोंद घेत दोघांना ताब्यात घेतले आहे. तन्मय मेश्राम याच्याशी आरोपीच्या बहिणीचे प्रेमसंबंध आहेत. याच रागातून ही घटना घडल्याचे तपासत पुढे आले आहे. यात दोघांना अटक केली असून आणखी दोघांचा शोध घेणे सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक योगेश पारधी यांनी 'ईटीव्ही भारत'ला दिली.