वर्धा - जिल्ह्यातील हिंगणघाट मतदारसंघ हा आगळा वेगळा निकाल देणारा मतदारसंघ आहे. शेतकरी संघटनेला पाठिंबा राहिलेला मतदारसंघ म्हणूनही याची ओळख आहे. 2014 च्या निवडणुकीत याने भाजपला साथ दिली. यंदा मात्र पुन्हा तेच तिन्ही उमेदवार रिंगणात असणार आहेत. फक्त यावेळी सेनेचे शिंदे यांनी बंडखोरी करत अपक्ष लढत सुरू केली आहे. मात्र, तिकीट न मिळाल्यावरून नाराज झाल्याने त्यांचा पाठिंबा कोणाला असेल हे येत्या ४ दिवसात स्पष्ट होईल.
वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट मतदारसंघाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राज्यमंत्री व शिवसेनेचे उपनेते अशोक शिंदे यांच्या वाट्याला हिंगणघाट मतदारसंघाची जागा न आल्याने नाराज झाले आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाजार समितीचे सभापती सुधीर कोठारी यांनी देखील पक्षाअंतर्गत बंड करून अपक्ष नामांकन अर्ज दाखल केला होता. राष्ट्रवादीकडून उमेदवारी माजी आमदार राजू तिमांडे यांच्या वाट्याला गेली. यामुळे कोठारी आणि त्यांचे समर्थक नाराज झाले.
हेही वाचा - अखेरच्या दिवशी महायुती, आघाडीसह अपक्षांनी भरले उमेदवारी अर्ज
यामुळे सुधीर कोठारी यांनी आघाडीत बंड पुकारला होता. मात्र पक्षातील वरिष्ठ नेत्यांच्या दबावाने तसेच सहकाऱ्यांसोबत झालेल्या चर्चेअंती सुधीर कोठारी यांनी आपला उमेदवारी अर्ज मंगळवारी मागे घेतला आहे. यात सुधीर कोठारी यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर ते पुढील ३ दिवसात आपल्या कार्यकर्त्यांशी चर्चा करून कुणाला समर्थन करायचं याबाबत आपली भूमिका स्पष्ट करणार आहे. विशेष म्हणजे १० तारखेला हिंगणघाट येथे राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांची सभा होत आहे. या सभेत सुधीर कोठारी उपस्थिती लावणार की नाही हे सुद्धा महत्वाचे असणार आहे.
हेही वाचा - वर्ध्यात अर्थमंत्र्यांच्या उपस्थितीत उमेदवारी दाखल; भाजपच्या तिन्ही उमेदवारांचे उमेदवारी अर्ज दाखल
शिवसेनेचे माजी राज्यमंत्री अशोक शिंदे यांनी आपला अपक्ष उमेदवारी अर्ज कायम ठेवला आहे. अशोक शिंदे यांच्या अपक्ष उमेदवारीनंतर भाजपसाठी काहीसा सोपा वाटणाऱ्या या विधानसभा मतदारसंघात आता चुरस निर्माण झाली आहे. या सगळ्या गर्दीत बंडखोर कार्यकर्त्यांसह कोण कोण पाठिंबा देते हे सुद्धा येत्या काही दिवसात स्पष्ट होईल.
हेही वाचा - शॉर्ट सर्कीटने चार लाखांचा ऊस जळून खाक; वर्ध्यातील विखणीची घटना
हिंगणघाट मतदारसंघात आणखी एक मजेशीर बाब म्हणजे मनसेचे उमेदवार यांचा नामांकन अर्ज नोटरी नसल्याने रद्द झाला. उघडपणे ही बाब साधारण दिसत असली तरी यामागे जातीय राजकारण शिजले असल्याची जोरदार चर्चा हिंगणघाट मतदारसंघात आहे. यामुळे मनसेचाही पाठिंबा नेमका उघडपणे दिला जाईल की अजून कोणाला हे ही लढतीत चुरस वाढवणारे असणार आहे.
हेही वाचा - वर्ध्यात रावण दहनाला आदिवासी समुदायाचा विरोध