वर्धा - राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज वर्ध्यातील सेवाग्राम आश्रमाला भेट दिली. सकाळी अकरा वाजता राष्ट्रपतींचे सेवाग्राम आश्रमात आगमन झाले. यावेळी राष्ट्रपतींनी सहकुटुंब आश्रमाला भेट दिली. आश्रमाला सहकुटुंब भेट देणारे ते पहिलेच राष्ट्रपती ठरले. यावेळी आश्रमात त्यांनी पत्नीसह अंबर चरखा चालवत सूतकताई केली.
राष्ट्रपती कोविंद यांनी सेवाग्राम येथे महात्मा गांधीच्या आश्रम परिसरातील आदी निवास, बा कुटी, बापू कुटी, खादी निर्मिती केंद्र आदी ठिकाणी भेट दिली. यावेळी कोविंद यांच्यासह पत्नी सविता, मुलगी स्वाती, राज्यपाल विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व आश्रम प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रभूसह आदींची उपस्थिती होती. यावेळी आश्रम प्रतिष्ठानच्या वतीन राष्ट्रपतींचे स्वागत करण्यात आले.
राष्ट्रपती आणि त्यांच्या पत्नी यांनी अंबर चरख्यावर सूतकताई केली. त्यांच्या मुलीनेही चरखा चालवून बघितला. त्यानंतर राष्ट्रपतींनी आश्रम परिसराची पाहणी करुन त्याबद्दल माहिती जाणून घेतली. त्यांनी खादी निर्मिती केंद्राची पाहणी केली. तसेच पैसे देऊन खादी सुद्धा खरेदी केली. यावेळी त्यांनी बापू कुटीतील प्रार्थनेत सुद्धा भाग घेतला. त्यानंतर महादेव भाई कुटी समोर राष्ट्रपतींच्या हस्ते चंदनाच्या झाडाचे वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी राष्ट्रपती कोविंद यांना महात्मा गांधींची आत्मचरित्र पुस्तिका हिंदी, इंग्रजी अशा दोन भाषेत भेट देण्यात आली. राष्ट्रपती नियोजित कार्यक्रमाच्या १५ मिनिटे जास्त थांबले. आश्रमाच्या वतीने राष्ट्रपतींना चरख्यातून होणाऱ्या उद्योग निर्मितीची माहिती देण्यात आली. राष्ट्रपतींनी पुन्हा आश्रमात येण्याची इच्छा व्यक्त केली. त्यांनी आश्रमातील अभिप्राय पुस्तिकेत आपला अभिप्राय सुद्धा नोंदविला.
राष्ट्रपतींनी जाणून घेतली कपडा निर्मितीची संपूर्ण पद्धत
राष्ट्रपतींना कपडे कसे बनवतात हे माहीत नव्हते. त्यांनी कपास ते कपडा निर्मितीची संपूर्ण पद्धत जाणून घेतली. दरम्यान, खादीची परिस्थिती अत्यंत वाईट आहे. यावर काही तरी करायला पाहिजे, असे सेवाग्राम प्रतिष्ठानाचे अध्यक्ष टीआरएन प्रभू यांनी राष्ट्रपतींना सांगितले.