वर्धा - जिल्ह्यात अनेक वर्षांपासून दारूबंदी आहे. त्यामुळे चोरट्या मार्गाने दारू विक्री करणारे नव-नवीन शक्कल लढवतात. वर्ध्याच्या वायगाव येथील रामपूर शिवारातही सुमेध नगराळे हा असाच नवीन फंडा शोधून दारूनिर्मिती करत होता. मात्र, याठिकाणी स्थानिक गुन्हे शाखेने छापा टाकून 3 हजार लीटर दारूचा सडवा नष्ट केला आहे.
हेही वाचा - महात्मा गांधीची हत्या केली पण त्यांचे विचार कसे मारणार?
याबाबत अधिक माहिती अशी की, वायगाव येथे सुमेध नगराळे याची ओव्याची शेती आहे. याठिकाणी शेतात दारूनिर्मिती करण्यासाठी चक्क तळघर तयार करण्यात आल्याचे समोर आले आहे. साधारण 9 ते 10 फूट आणि 8 बाय 14 आकाराची खोली तयार करण्यात आली आहे. याठिकाणी दारूसाठी लागणारा कच्चा माल म्हणजे मोहाच्या फुलाला सडवत सडवा तयार केला जात होता. त्यानंतर भट्टी लावत दारू गाळली जाते. हा दारू सडवा काही दिवस सडवला जातो. त्यामुळे येथे पुन्हा-पुन्हा जाण्याची गरज पडू नये, यासाठी विहिरीतून पाईपलाईन टाकण्यात आली होती. सडवा तयार झाला की दारू बाहेर काढण्यासाठी सुद्धा एक वेगळी मोटार आणि पाईपलाईन बसवण्यात आली आहे.
हेही वाचा - जागतिक शांततेचा संदेश देणाऱ्या यात्रेचा मार्ग अशांततेने बदलला....!
सुमेध नगराळेला याआधी 2 वर्षांपूर्वी दारूसाठी भट्टी न लावता चक्क पाणी गरम करण्यासाठी वापरण्यात येणारी कॉईल लावून दारू काढल्याच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली होती. त्यानंतर आताही स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली आहे. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक आशिष मोरखेडे, पोलीस जमादार निरंजन वरभे, नरेंद्र डहाके, पोलीस कर्मचारी संजय देवरकर, नितीन इटकरे, विकास अवचट, संघर्षन कांबळे, राकेश आष्टनकर आदींनी हा दारूसाठा नष्ट केला.