वर्धा - शिक्षक, शिक्षकेतर कर्मचार्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी अधिवेशनात लावून धरावी. यासाठी वर्धा ते नागपूरपर्यंत पायदळ दिंडी काढण्यात आली. या पायदळ दिंडीची सुरुवात वर्ध्याच्या महात्मा गांधी पुतळ्यापासून झाली. ही दिंडी नागपुरात पोहोचणार आहे.
हेही वाचा- एकदम कडक..! पन्हाळा गडावरील 'झुणका भाकर' पुन्हा तेजीत
पायदळ दिंडीत शिक्षकांची प्रतिकात्मक शवयात्रा काढण्यात आली. ही दिंडी नागपूरच्या विधानभवनावर धडकून समारोप होणार आहे. आमदार श्रीकांत देशपांडे, दत्तात्रय सावंत, ज.मो.अभ्यंकर, बाळाराम पाटील, किशोर दराडे यांच्या नेतृत्वात ही दिंडी काढण्यात आली आहे.
एक नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना शाळा १०० टक्के अनुदानित नसल्याचे सांगत जुनी पेन्शन योजना बंद करण्यात आली. या ऐवजी नवीन अंशदान पेन्शन योजना लागू केली. मात्र, या योजनेला शिक्षकांच्या असंतोषामुळे शासनाने जुनी पेन्शन योजना लागू करावी, अशी मागणी केली जात आहे. विधानसभा अधिवेशनात यावर लक्ष न दिल्यास तीव्र आंदोलन करणार असल्याची माहिती आमदर श्रीकांत देशपांडे यांनी दिली.
राज्यातील साठ हजार शिक्षकांना न्याय देण्याची भूमिका शासनाने घ्यावी. पुरोगामी तिन्ही पक्षाचे हे सरकार स्थापन झाले आहे. पेन्शन योजनेवर सरकार नक्कीच विचार करतील आणि मागण्या मान्य करतील, अशी खात्री असल्याचे आमदार दत्तात्रय सावंत यांनी व्यक्त केली.