वर्धा - समुद्रपूर तालुक्यातील नारायणपूर (कोरा) येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षकच उशिरा येत असल्याने आज (सोमवारी) पालकांनी संतप्त होत शाळेला कुलूप ठोकले. पालकांनी अधिकाऱ्यांना वारंवार तक्रार करूनही दुर्लक्ष केले जात होते. कोणतीच कारवाई होत नसल्याने शिक्षकांना धडा शिकवण्यासाठी पालकच शाळेत पोहचले. अखेर सोमवारीही शिक्षक पोहोचले नसताना पालकांनी कुलूप लावत शिक्षकांवर कारवाईची मागणी लावून धरली.
नारायणपूर कोरा जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक बाहेर गावावरून ये-जा करतात. शाळेची वेळ ही सकाळी 10 वाजताची असताना येथे कार्यरत असलेले शिक्षिक 12 वाजता येत असल्याचा आरोप पालकांनी केला. शिक्षक शाळेत येताना उशिरा येत असले तरी जाताना मात्र घाई करणे हा नित्याचा प्रकार झाला आहे. या प्रकारामुळे विद्यार्थी शाळेच्या वर्गखोलीत दिसण्याऐवजी शाळेच्या पटांगणात तासंतास खेळताना दिसतात. याचा परिणाम अभ्यासक्रमावर होत असल्याने विद्यार्थी शिक्षकांच्या प्रतीक्षेत बसलेले असतात. यामुळे संतप्त पालकांनी जाऊन शाळेला कुलूप ठोकले.
हेही वाचा- स्वीडनच्या ग्रेटाच्या आंदोलनाला सेवाग्रामच्या आनंद निकेतनचा हातभार
या शाळेच्या मुख्याध्यापक एस. जवादे आणि कळमकर नामक शिक्षिका या पदावर कार्यरत आहे. मुख्याध्यापक हे प्रशिक्षणावर गेले असल्याने उपस्थित नव्हते. तसेच महिला शिक्षिका यांची रेल्वे उशिरा असल्याने येण्यास उशीर झाल्याचे कारण पुढे केले आहे. याबाबत केंद्र प्रमुख विनय सोनलकर यांनी शाळा उघडल्याची माहिती दिली. तसेच शिक्षकांना जाब विचारून पुढील चौकशी केली जाईल, अशी माहितीही त्यांनी दिली.
हेही वाचा- ...अन वाहत्या नाल्याकाठीच 'तिने' सोडला जीव, वर्ध्यातील धक्कादायक घटना