वर्धा - मुंबईवरून चंद्रपूरच्यादिशेने जाणाऱ्या पार्सल रेल्वे गाडीचे डबे वर्ध्यात घसरले. चौथ्या लूप लाईनवरुन घसरलेले हे डबे हलवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या कामाकडे रेल्वे विभागाचे, जीआरपी आणि आरपीएफचे अधिकारी लक्ष ठेवून आहेत.
रेल्वे ट्रॅकला तडा गेल्याने हे डबे घसरल्याची प्राथमिक माहिती पुढे येत आहे. सुदैवाने ही प्रवासी ट्रेन नसल्याने मोठा अपघात टळला. इंजिनपासूनचा पाच आणि सहा हे दोन डबे रुळावरून घसरले आहेत. सध्या दोन्ही रेल्वे डबे वेगळे करून ट्रॅकची परिस्थिती तपासून रेल्वे पुढील प्रवासासाठी रवाना केली जाणार आहे.
डबे हलवण्यासाठी नागपूरवरून बोलावले क्रेन -
रात्री 9 वाजता हे क्रेन नागपूरवरून बोलावण्यात आले. याच्या मदतीने इंजिनला लागून असलेले चार डब्बे वेगळे करण्यात आले आहे. याच क्रेनच्या सहाय्याने घसरलेले डबे उचलून रुळाच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. रात्री उशिरापर्यंत हे काम चालणार असल्याची माहिती मिळाली आहे.
वाहतुकीवर प्रभाव नाही -
ही रेल्वे चंद्रपूर बल्लारशाहच्या दिशेने जात होती. वर्धा रेल्वे स्थानकाजवळ गाडी चौथ्या लूप लाईनवरून जात असताना घसरली. या ट्रॅकवर मुख्य वाहतूक नसल्याने वाहतूक प्रभावित झाली नाही.