वर्धा - शहरातील महात्मा गांधी पुतळ्याजवळ हिंगणघाट येथील घटनेच्या निषेधार्थ आत्मक्लेश आंदोलन करण्यात आले. यात युवकांनी दिवसभर उपवास ठेवत राष्ट्रसंत तुकडोजी महाराजाचे भजन कीर्तन आणि महात्मा गांधींच्या विचाराला अनुसरून आत्मकेलश केला. हिंगणघाट येथील घटना क्रूर आहे. मात्र, ही याच समाजातील एका युवकाने केल्याने चांगला समाज घडविण्यास आपण अपयशी ठरलो आहे. यासाठी समाज म्हणून आपण सुद्धा दोषी आहे, ताई मला माफ कर, पुन्हा असे होऊ नये आणि अहिंसात्मक चांगला समाज घडवण्यासाठीचा संदेश देण्याचा हा आत्मक्लेश असल्याचे सांगण्यात आले.
दोषीने केलेले कृत्य क्रूर आहे. मात्र, तो याच समाजातला आहे. त्याला फाशी द्या. मात्र, आपण समाज म्हणून कमी पडलो. आज असंख्य महिलांनावर होणारे अत्याचार थांबवायचे असतील तर महिलांना आदिशक्तीचे स्थान दिले पाहिजे. तिला मान सन्मान दिला पाहिजे. समाज या आंदोलनादरम्यान 'का म्हणता अबला तिला, ती शक्तीशाली नाही का' यासह अनेक उदाहरण राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी आपल्या विचार मांडले आहे. त्याचा विसर पडला. महात्मा गांधींनी अहिंसेचा संदेश दिला. त्याचा विसर पडला. समाज सुधरवायचा असेल तर त्याची सुरुवात आपल्यापासून करायला पाहिजे म्हणून हा आत्मक्लेश करण्यात येत आहे.