वर्धा - अल्लीपूर येथे मित्रानेच मित्राची दगडाने ठेचून हत्या केल्याची घटना उघडकीस आली. सुरुवातीला अज्ञात मृतदेहाची ओळख पटवत स्थानिक गुन्हे शाखेने हत्येचा गुन्हा उघडकीस आणला. यात मृताने मारेकऱ्याच्या पत्नीवर वाईट नजर टाकल्याने हा खून केल्याचे तपासत उघड झाले असून याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. यात अविनाश फुलझेले असे मृताचे तर चेतन जवादे आणि निखिल ढोबळे अशी मारेकऱ्यांची नावे आहेत. हे तिघेही मित्र असल्याचे समोर आले आहे.
हत्येमागील मारेकऱ्याच्या सुगावा
मृतदेहाची ओळख पटताच पोलिसांनी तपासाची चक्र फिरली. मृत बेपत्ता होण्याच्या दिवशी त्याच्या दोन मित्रांसोबत असल्याचे समजले. त्याच दिवसापासून ते दोघेही बेपत्ता असल्याचे समजल्याने संशय बळावला. काही तासातच एकाला हिंगणघाट आणि दुसऱ्याला देवळी हद्दीतून ताब्यात घेण्यात आले. दोघांनाही पोलीसी खाक्या दाखवण्याचे काम स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीने करण्यात आले. यात दोघांनी हत्येची कबुली दिली.
मृत व्यक्तीची मित्राच्या पत्नीवरच होती वाईट नजर
मृतक अविनाश फुलझेले हा सचिन जवादेचा मित्र होता. यामुळे त्याचे घरी येणे जाणे होतेच. याच दरम्यान अविनाशने सचिनच्या पत्नीवर वाईट नजर ठेवत तिच्याशी अश्लील संवाद केले. यात अनैतिक संबंध ठेवण्याच्या प्रयत्न करत असल्याचे पुढे आले. हा प्रकार सचिनच्या पत्नीने सांगितल्यानंतर त्याला राग अनावर झाला. यावेळी तिसरा मित्र निखिल ढोबळे याच्या मदतीने हत्येचा कट रचत अविनाशला संपवले.
'त्या' दिवशी दारू पिऊन केली हत्या
सचिन जवादे आणि निखिल ढोबळे याने हत्या करण्याच्या अनुषंगाने अविनाश फुलझेलेला सोबत घेतले. सुरुवातील त्यांनी मद्यपान केले. त्यानंतर सोनेगाव शिवरात मुख्य मार्गापासून काही अंतरावर असलेल्या शेतात दुचाकीने अविनाशला नेण्यात आले. या ठिकाणच्या कापसाच्या पिकात त्याच्या डोक्यावर दगड टाकून त्याला संपवले. तसेच ओळख पटू नये, यासाठी चेहरा पूर्णतः विद्रुप केला.
48 तासांत गुन्हा उघडकीस
मृतदेहाची ओळख नसताना 48 तासांत स्थानिक गुन्हे शाखेने खुनाची कबुली मिळवत आरोपींना जेरबंद केले. यामध्ये पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक निलेश ब्राह्मणे यांच्या सूचनेवरून पोलीस कर्मचारी गजानन लामसे संतोष दूरगुडे, शेख हमीद, रणजित काकडे, अनिल कांबळे, चंद्रकांत बुरंगे, श्रीकांत खडसे, व अन्य कर्मचाऱ्यांच्या पथकाने खुनाचा उलगडा करण्यात कामगिरी बजावली.