वर्धा - कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रत्येकाने काळजी घेण्याची गरज आहे. यासाठी वर्ध्यात 'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' हे अभियान राबविण्यात आले. या अभियानाच्या माध्यमातून प्रत्येक घरात जाऊन प्रत्येकाची तपासणी करत कोरोनापासून कसा बचाव करता येईल, याची माहिती देण्यात आली. वर्ध्यात 10 दिवसात 92 हजार नागरिकांशी संवाद साधत तपासणी करण्यात आली आहे.
या अभियानाअंतर्गत शहरी आणि ग्रामीण भागात जाऊन पथकांनी भेटी दिल्या. यात आरोग्य कर्मचारी, स्वयंसेवी संस्था, स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्या मार्फत घरापर्यंत जाऊन माहिती देण्यात आली. यासाठी जिल्ह्यातील 603 पथकामार्फत 25 हजार 415 घरी भेटी देण्यात आल्या आहेत. यात 92 हजार 690 नागरिकांशी संवाद साधत तपासणी करण्यात आली. या अभियाना दरम्यान 124 नागरिकांना सर्दी, ताप अशी लक्षणे दिसून आली. याशिवाय ऑक्सिजनची पातळी 95 टक्केच्या कमी असलेले 25 जण आढळून आले. त्यांना उपचाराची गरज असल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले.
पथके गृहभेटी दरम्यान भेट दिलेल्या घरांना स्टिकर लावण्यात आले. कुटुंबाना आरोग्य ॲपची नोंदणी करण्यास सांगण्यात आले. ॲप कसे हाताळावे, याचीही माहिती देण्यात आली. या अभियानात प्रत्येक व्यक्तीची तापमानाची नोंद करण्यात आली. यासह घरातील सदस्यांना कर्करोग, अस्थमा, मधूमेह, किडनी यासारखे जोखमीचे आजार आहे का? याचीही माहिती घेत नोंद करण्यात आली. तसेच मास्क लावणे, वारंवार साबणाने हाथ धुणे, मास्क घालून असताना वारंवार नाक, तोंड, डोळे यांना वारंवार हात लावू नये, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, अशा सुचनावजा माहिती देण्यात आली.