वर्धा - परिवहन मंत्री दिवाकर रावते यांचे वाहन पुलगाव येथे तपासण्यात आले. यावेळी रावते यांनी तपासणी कर्मचाऱ्याला मला ओळखत नाही का ? असे म्हणत पदाचा तोरा दाखविला. त्याचबरोबर त्यांनी तपासणी कर्मचाऱ्यांशी शाब्दिक वादही केला. ही घटना मंगळवारी पुलगाव येथील राम मंदिराजवळ घडली.
मंगळवारी दुपारी सव्वा चारच्या सुमारास दिवाकर रावते आपल्या ५ वाहनांच्या ताफ्यासह पुलगावला चालले होते. पुलगावला शिवसेनेच्या उमेदवाराची जाहीर सभा होती. या सभेमध्ये सहभागी होण्यासाठी ते पुलगावला येत होते. दरम्यान पुलगाव येथील राम मंदिराजवळ कर्तव्य बजावत असलेल्या स्ठिर सर्वेक्षन पथकाने रावते यांची गाडी थांबवली. यावेळी पथकाला गाडीची तपासणी करू देण्याऐवजी दिवाकर रावते यांनी तपासणी कर्मचाऱ्याला मला ओळखत नाही का?, असा सवाल करत राज्यमंत्री असल्याचा तोरा दाखविला. यावेळी रावते यांची तपासणी कर्मचाऱ्याशी शाब्दिक वादावादी देखील झाली.
यावेळी कर्तव्यावर असलेले अधीकारी व कर्मचाऱ्यांनी रावते यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. निवडणूक विभागाच्या आदेशावर तपासणी होत असल्याचे अधीकऱ्यांकडून सांगण्यात आले. त्यानंतर तपासणी पथकातील कॅमेरामॅनने रावते यांच्या गाडी भोवताल कॅमेरा फिरवला. त्यानंतर वाहनाची डिक्कीही तपासण्यात आली. मात्र ते पाहून दिवाकर रावते यांचा पारा अजूनच भडकला. रावते यांनी कॅमेरामॅनसह उपस्थितांना मी कोण हे तुम्हाला माहित नाही काय?, असा सवाल करून बराच वेळ वाद घातला. सोबतच रावते यांनी वाहनातील काही बॅगही फेकल्या.
हेही वाचा- भाजपच्याच शेतकरी कार्यकर्त्याची कर्जाला कंटाळून आत्महत्या - राहुल गांधी
दरम्यान त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या प्रत्यक्षदर्शींतील काहींनी हा प्रकार मोबाईलमध्ये कैद करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना देखील मोबाईलमधले रेकॉर्डींग डिलीट करायला लावण्यात आल्याचे सांगितले जात आहे. शेवटी पुलगाव पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद घेण्यात आली. यातही २० मिनिटे वादावादी चालल्याची नोंद झाल्याची सूत्रांकडून समजले आहे. दरम्यान, पोलीस विभागाने या घटनेविषयी मौन बाळगले आहे.
हेही वाचा- 'विदर्भ एक्स्प्रेस'समोर उडी घेऊन तरुणीची आत्महत्या