वर्धा - हिंगणघाट येथील प्राध्यापिका जळीत हत्याकांड प्रकरणाची आज न्यायालयात सुनावणी पार पडली. न्यायालयाने आरोपी विकेश नगराळेवरील आरोप सिद्ध केले आहेत. त्यामुळे शिक्षेची सुनावणी उद्या होईल, अशी माहिती सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी पत्रकारांना दिली. तर हत्येचा दोष सिद्ध झाल्याने आमच्यावर अन्याय झाला असाल्याचा आरोप विकेश नगराळेचे वकील भूपेंद्र सोनी यांनी माध्यमांशी बोलताना केला आहे. हिंगणघाट येथील जिल्हा व सत्र न्यायालयात सुनावणी पार पडली. सुनावणीदरम्यान पीडितेचे आई-वडील न्यायालयात उपस्थित होते. उज्ज्वल निकम यांनी सरकारी पक्षाची बाजू मांडली तर बचावपक्षाकडून अॅड. भुपेश सोने उपस्थित होते. परिसरात पोलिसांचा चोख बंदोबस्त होता.
19 दिवसात महिला अधिकाऱ्यांनी दाखल केले दोषारोपपत्र -
या प्रकरणात महिला तपास अधिकारी तथा उपविभागीय पोलीस अधिकारी तृप्ती जाधव यांनी कार्यालयीन कामकाज पूर्ण करत १९ दिवसांत दोषारोपपत्र तयार केले. त्यात २८ फेब्रुवारीला प्रकरणात आरोपी विक्की उर्फ विकेश नगराळे याच्याविरुद्ध तब्बल ४२६ पानांचे दोषारोपपत्र पोलीस निरीक्षक सत्यवीर बंडीवार यांनी हिंगणघाटच्या प्रथम श्रेणी न्यायालयात दाखल केले. त्यानंतर 14 डिसेंबर 2020 पासून सुनावणीला सुरूवात झाली.
29 जणांची साक्ष -
आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी यासाठी सरकारी वकील उज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली. प्रकरणाची गंभीरता लक्षात घेता प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आणि परिस्थितीजन्य पुराव्याच्या आधारावर दोन्ही बाजूच्या वकिलांनी प्रश्न उत्तर विचारत साक्ष नोंदवत उलटतपासणी केली. अंतिम सुनावणी 21 जानेवारीला झाली. दोन्ही बाजू ऐकुण घेत अंतिम टप्पा म्हणून 5 फेब्रुवारीला निकाल देणार अशी माहिती सरकारी वकील उज्वल निकम यांनी दिली. तसेच आरोपी विकेश नगराळेंचे वकील यांनी दोन्ही पक्षाचे लेखी आणि मौखिक युक्तिवाद संपला असून न्यायालय पाच तारखेला निर्णय देणार असल्याचेही सांगितले.
![पोलिसांचा चोख बंदोबस्त होता](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-war-hinganghat-case-verdict-7204321_09022022125610_0902f_1644391570_647.jpg)
काय आहे घटना -
घटनेतील मृत प्राध्यापिका ही हिंगणघाटच्या स्व.आशाताई कुणावार महिला महाविद्यालयात वनस्पतीशास्त्र विषयाची अर्धवेळ प्राध्यापक म्हणून कार्यरत होती. घटनेच्या दिवशी नियमितपणे 3 फेब्रुवारी 2020 ला सकाळी आपल्या घरातून बसने हिंगणघाटला पोहोचली. त्यानंतर नंदोरी चौकापासून काही अंतरावर कॉलेजच्या दिशेने जाताना आरोपी विकेश नगराळे वाट पाहत होता. मनात राग ठेवून दुचाकीतील पेट्रोल अंगावर टाकून पीडितेला पेटवण्याचा बेत त्याच्या मनात होता. दिसताक्षणीच आरोपीने पीडितेच्या अंगावर पेट्रोल टाकले आणि तिला पेटवून दिले. घटनेनंतर लगेच प्राथमिक उपचार करत गंभीररित्या जळालेल्या अवस्थेत तिला नागपूरच्या ऑरेंजसिटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. आठवडाभर मृत्यूशी झुंज देत तिने 10 फेब्रुवारीला अखेरचा श्वास घेत जगाचा निरोप घेतला. मृत्यूनंतर मूळ गाव दरोडा येथे मृतदेह पोहोचताच आरोपी विकेश नगराळेला फाशी देण्याची मागणी करण्यात आली. रस्ता रोको करत मृतदेह असलेल्या रुग्णवाहिकेवर आणि पोलिसांवर सुद्धा दगडफेक झाली.