वर्धा - चिऊताई अशी हाक आता तिच्या दिसण्याप्रमाणेच दुर्मिळ झाली आहे. या सिमेंटच्या जंगलात तिचे हक्काचे घर हिरावले गेले आहे. पण आपलीच जबाबदारी समजून सेलूच्या 'फिरता फिरता ग्रुप'ने या चिऊताईला घर तयार करून दिले आहे. चिमण्यांचे नवे घरटे फेकले जाणारे खर्डे जमा करून खर्ड्यांना सेलूच्या फिरता फिरता ग्रुपच्या सदस्यांनी घरट्यांचा आकार दिला आहे. हे घरटे वाटप करून आता चिमण्यांना त्यांच्या हक्काचे घरटे मिळवून देणारा हा उपक्रम आहे.
आज जागतिक चिमणी दिवस असल्याने आजपासून तयार घरटे वाटप करण्याच्या उपक्रमाला सुरुवात करण्यात आली आहे. किराणा दुकान कापड दुकानातून हे खर्डे जमा करण्यात आले. मागील 15 दिवसांपासून या घरट्यांना रंगरंगोटी आणि कल्पकतेने आकार देण्यात आला. या घरट्यांवर सुंदर असे संदेश देण्यात आले. चिमणी वाचवा, चिऊताईला पाणी द्या, आज लक्ष नाही दिले तर उद्याच्या पिढीला या चिमण्यांना केवळ चित्रात पाहावे लागेल, अशी संवेदनशील वाक्ये लिहून या घरट्यांना आकार देण्यात आला.
हेही वाचा - कमालच आहे!... आता बसस्थानकातील सॅनिटायझरच्या बाटल्याही गेल्या चोरीला
यासोबतच विविध धार्मिक विधी आणि पूजा सामुग्रीमध्ये मातीच्या भांड्याचा उपयोग केला जातो. या मातीच्या भांड्याना गोळा करत चिमणीसाठी पाणी ठेवण्याचे आव्हान करण्यात येणार असल्याचे ग्रुपचे मंगेश भुते आणि सहकारी सांगतात. अमर सावरकर, ललित पोहाणे, नितीन लाडे, अंकित पोहाणे, शुभम भलावे यांनी मागील अनेक दिवस परिश्रम घेत कल्पकतेतून ही घरटी तयार केली आहेत. एकिकडे लोक सोशल मीडियावर भरपूर वेळ घालवतात तर हे तरुण कधी पक्ष्यांसाठी तर कधी मुक्या प्राण्यांसाठी धडपड करत फिरत असतात. यातूनच त्यांनी फिरता फिरता ग्रुप तयार करत या कामाला सुरुवात केली आहे.
मागील वर्षी सुद्धा अशाप्रकारे घरटे तयार करून चिमणी दिवसांपासून वाटप करायला सुरुवात केली. पण ते कमी पडले. यामुळे अनेकांना देऊ न शकलेल्यांना यंदा हे घरटे देता येईल याचा आनंद असल्याचेही सांगतात. या उपक्रमांचे सर्वत्र कौतुक होत आहे. सिमेंटच्या जंगलात केवळ गाड्याच्या आणि हॉर्नच्या आवाज ऐकायला मिळतो. पण चिवचिवाट आता हरवत चालला आहे. पण फिरता फिरता सारख्या ग्रुपच्या प्रयत्नानातून तो चिव चिव असा आवाज पुन्हा ऐकायला मिळाला तर नक्कीच आनंद देणारा ठरेल. यासाठी त्यांच्या कामाला शुभेच्छा देऊ या.