वर्धा - पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, सातारा व कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये आलेल्या महापुरात लोक संकटात सापडले होते, अशा परिस्थितीत महाराष्ट्रातील जनतेने जातीभेद, धर्मभेद विसरून महापुरात अडकलेल्या लोकांच्या मदतीला हातभार लावला. अडचणींच्या काळात महाराष्ट्राच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात असलो तरी एकमेकांच्या मदतीला धावून येऊ शकतो, हे दाखवून दिल्याने आज राज्य कृषी मंत्री सदाभाऊ खोत यांनी महाराष्ट्राच्या जनतेला सलाम केला. तसेच समस्त महाराष्ट्रवासीयांनाही त्यांनी यावेळी स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या.
वर्ध्यात जिल्हा क्रीडा संकुल येथे स्वातंत्र्यदिनाचा मुख्य शासकीय कार्यक्रम पार पडला, यावेळी उपस्थित नागरिकांना संबोधित करताना ते बोलत होते.
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सैन्य, नौदल आणि वायुसेनेच्या दलासोबतच सर्व जिल्ह्यातून मदतीचा ओघ सुरू आहे. संकटाच्या काळात महाराष्ट्राने एकतेचे दर्शन घडविले असेही म्हणाले.
महात्मा गांधीचे 150 वे जयंती वर्ष आणि विनोबा भावे यांची 125 वी जयंती देशभर साजरी होत असल्यामुळे, यावर्षीच्या स्वातंत्र दिनाचे विशेष महत्व आहे. असे सांगत, वर्ध्यातून सुरू झालेल्या शेतकरी चळवळीचे नेते शरद जोशी यांच्या योगदानाबद्दलही त्यांनी गौरवोद्गार काढले. यासोबतच त्यांनी, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते विशेष पुरस्काराने गौरव करण्यात आलेल्या वर्ध्यातील स्वातंत्र सेनानी गणेश वाजपेयी यांचे अभिनंदन केले. तसेच, आष्टी शाहिद येथील हुतात्मा झालेल्या सहा जवानांना सुद्धा आदरांजली वाहिली.
वर्धा जिल्ह्याच्या विकासासाठी शासनाने सर्वसमावेशक असा आराखडा तयार केला आहे. यामध्ये सेवाग्राम, पवनार आणि वर्धा या गावातील महात्मा गांधींच्या स्मृतिस्थळाच्या संवर्धनासोबतच एक प्रेरक पर्यटनस्थळ म्हणून विकास करण्याचे काम सुरू आहे. यामध्ये स्वातंत्र्यपूर्व काळात ज्या चरख्याने संपूर्ण देशाला बांधून ठेवले, त्या चरख्याची सर्वात मोठी प्रतिकृती सेवाग्राम येथील नवीन सभागृहाच्या ठिकाणी उभारण्यात आली आहे. त्याचबरोबर रिसर्च सेंटर आणि ग्रंथालय, हेरिटेज ट्रेल, पर्यटकांसाठी राहण्याची उत्तम सुविधा, धाम नदी घाटाचे सौंदर्यीकरण, हॉकर्स प्लाझा, आणि वर्धा शहरातील सर्व चौकांचे सौंदर्यीकरण करण्यात येत आहे. आराखड्यातील ही सर्व कामे पूर्ण झाल्यावर, वर्धा शहर पर्यटनाच्या दृष्टीने एक उत्तम शहर म्हणून ओळखले जाईल असेही सदाभाऊ यावेळी म्हणाले.
याप्रसंगी जिल्हाधिकारी विवेक भिमनवार, मुख्य कार्यपालन अधिकारी सचिन ओम्बासे, जिल्हा पोलिस अधिक्षक बसवराज तेली, अपर जिल्हाधिकारी संजय दैने, अपर पोलीस अधिक्षक निलेश मोरे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बढे, निवासी उपजिल्हाधिकारी विजया बनकर, जिल्हा माहिती अधिकारी मनीषा सावळे, तहसिलदार प्रीती डुडुलकर तसेच इतर प्रशासकीय अधिकारी देखील उपस्थित होते.