वर्धा - हिंगणघाट पोलीस ठाणे अंतर्गत सुलतानपूर परिसरात गुंडगिरी करून सर्वसामान्यांना त्रास देणाऱ्या तिघांच्या टोळीला १ वर्षासाठी तडीपार करण्यात आले. पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांनी याचे आदेश दिले आहेत. समाजात शांतता व सुव्यवस्थेच्या दृष्टीने ही कारवाई करण्यात आली असल्याचे पोलीस प्रशासनाने सांगितले. तिघांना हिंगणघाट पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणास मज्जाव करण्यात आला आहे. या कारवाईने नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
सुरज यादवराव आटोळे, रोशन गजानन भगत आणि सुदन गजानन भगत असे तडीपारीची कारवाई करणात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तिघांना चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा चिमूर पोलीस ठाणे अंतर्गत नातेवाईकाकडे सोपवत ही तडीपारीची कारवाई पूर्ण करण्यात आली. तिघेही हिंगणघाट ते सुलतानपूर दरम्यान असणाऱ्या एका पुलावर बसून नागरिकांना त्रास देत होते. तिघेही गुंडप्रवृत्तीचे असून येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांना ते त्रास देत असत. त्यांच्या या त्रासामुळे लोकांना घराबाहेर पडणे कठीण झाले होते.
तिघांवर जबरी चोरी, घातक शस्त्र वापरणे, खुनाचा प्रयत्न, घरात प्रवेश करून मारहाण, जीवे मारण्याची धमकी, नागरिकांना गुंडगिरीने भीती दाखवणे तसेच अनेक गंभीर प्रकारचे गुन्ह्याचा आरोप आहे. यामुळे या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांनी तिघांना महाराष्ट्र पोलीस कायदा 151 कलम 55 अन्वये एक वर्षासाठी तडीपार करण्याचे आदेश दिले आहेत.
ही कारवाई पोलीस अधिक्षक बसवराज तेली, अप्पर पोलीस अधिक्षक निखिल पिंगळे, भीमराव टेळे यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार सत्यवीर बंडीवार, पीएसआय अमोल कोल्हे, सहाय्यक फौजदार विवेक लोणकर राजेश तिवस्कर, राम इप्पर, अभय वानखडे, उमेश बेले आदींनी केली.