वर्धा - आर्वी तालुक्यासह लगतच्या भागात मागील दोन-तीन दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. परिणामी नदी नाले ओसंडून वाहत आहेत. मंगळवारी सायंकाळी झालेल्या मुसळधार पावसाने सावळापूर येथील मातीकाम केलेला पूल वाहून गेला. शिवाय मुसळधार पावसामुळे गावात तसेच नदी आणि नाल्याकाठच्या शेतात पाणी शिरल्याने पिकांचे नुकसान झाले आहे.
आर्वी शहरापासून काही अंतरावर वर्धा मार्गावरील सावळापूर हे छोटेसे गाव आहे. सध्या रस्त्याचे सिमेंटीकरण आणि रुंदीकरण सुरू आहे. बांधकाम प्रगतीपथावर असल्याने वाहतुकीसाठी साईडरोड करण्यात आला. पण, जोरदार पावसाची हजेरी आणि नाल्याच्या पाण्याच्या प्रवाहामुळे मातीकाम केलेला पूल वाहून गेला. या मार्गावरील वाहतूक बंद असून पिंपळखुट्यावरून वळवण्यात आली आहे. शिवाय बुधवारीही पाऊस असल्याने दुरुस्तीची कामे होऊ शकली नाहीत.
विजेच्या कडकडाटसह अनेक भागात पावसाने बुधवारी सुद्धा हजेरी लावली. अवघ्या दोन तासात बरसलेल्या मुसळधार पावसाने नदी नाले ओसंडून वाहू लागले. शिवाय पूल वाहून गेल्याने वर्ध्याकडून आर्वीला बसचा मार्ग बदलण्यात आला आहे. तेच सावळापूर, बेढोणा, वाढोणा, पाचोड आदि गावांचा आर्वीसोबत संपर्क करताना लांब फेऱ्याने यावे लागत आहे.
हेही वाचा - वर्ध्यात जनता कर्फ्यूचे आवाहन... काहींचा होकार तर, काही विरोधात