वर्धा - लॉकडाऊन जाहीर झाले आणि कैच्या थांबल्या. आता मागील दोन महिन्यांचा कालावधी लोटल्यानंतर चौथ्या टप्प्यात मिळालेल्या शिथिलतेत सलून आणि ब्युटी पार्लर उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. यामुळे व्यावसायिकांना दिलासा मिळाला आहे. बुधवारपासून केशकर्तनालयात कैची चालणार आहे. यासाठी आमदार पंकज भोयर आणि समीर कुणावार यांनीही मागणी केली होती. अखेर जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशानंतर हा प्रश्न सुटला आहे.
सलून, ब्यूटी पार्लर, स्पा हे अत्यावश्यक नसल्याने ग्रीन झोन असतानाही यासाठी शिथिलता देण्यात आली नाही. यामुळे, या 58 दिवसाच्या कालावधीत अनेकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. यामध्ये अनेक महिला ब्युटी पार्लरच्या माध्यमातून कुटुंबाचा गाडा चालवण्यासाठी हातभार लावतात त्या कुटुंबीयांनासुद्धा याचा फटका बसला. यासाठी नाभिक समाजाकडून निवेदन देण्यात आले. यानंतर आमदार पंकज भोयर आणि आमदार समीर कुणावार यांनी जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत या कुटुंबांच्या व्यथा मांडून दुकाने खुले करण्यास परवानगी देण्यासाठी मागणी लावून धरली. याला अखेर चौथ्या टप्प्यात परवानगी मिळाली.
ग्राहकांना या अटींचे करावे लागेल पालन
सलूनमध्ये येताना प्रत्येक ग्राहकाने स्वत:चा टॉवेल नॅपकीन आणावा. त्याशिवाय दुकानात प्रवेश देवू नये. ग्राहकाचे केस कापल्यावर खुर्च्या सॅनिटाइज करून घ्याव्या यासह इतर साहित्याचेसुध्दा निर्जंतुकीकरण करावे. दुकानात गर्दी न होऊ देता फिजिकल डिस्टन्सिंग पाळावे, या अटींवर सकाळी सात ते सायंकाळी सहापर्यंत दुकाने उघडण्यास परवानगी देण्यात आली.
वर्धा जिल्हा सलून असोसिएशनच्यावतीने अध्यक्ष लीलाधर येऊलकर, श्रीकांत वाटकर, सचिव आशिष ईझनकर, प्रदीप वाटकर, कार्याध्यक्ष अनिल अंबुलकर, उमेश किनारकर यांनी आमदार भोयर यांचे आभार मानले. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष नितीन मडावी, भाजपचे जिल्हा महामंत्री सुनील गफाट, भाजपचे नेते जयंत येरावार, प्रवीण चोरे आदी उपस्थित होते.