वर्धा - शहरातील पिपरी मेघेच्या शिवराम वाडी परिसरात सात दिवसांपूर्वी झालेल्या विवाह सोहळ्याने अनेकांना अडचणीत आणले आहे. यात वधू-वर हे दोन्ही वर्ध्यातील आहेत. मात्र, नवरदेवाला बाहेर जिल्ह्यातून आलेल्या एका पाहुण्यापासून कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. या लग्नात शासनाने घालून दिलेल्या नियमाचे उल्लंघनही झाले आहे. यामुळे संबंधितांवर कारवाईचे संकेत उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे यांनी पत्रकार परिषदेत दिले. तर या प्रकारामुळे लग्नात सहभागी झालेल्यांना कोरोनाची लागण झाल्याची शक्यता नाकारता येत नाही.
शहरातील शिवराम वाडी परिसरात 30 जूनला विवाह सोहळा पार पडला. मात्र, 28 जूनला झालेल्या एका कार्यक्रमात (कंदोरी) 200 पाहुणेमंडळी सहभागी झाले होते. विवाह समारंभात बाहेर जिल्ह्यातून काही परवानगी घेऊन तर काही चोरट्या मार्गाने आले असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. प्रशासनाच्या वतीने सर्व बाबींचा शोध घेतला जात आहे. हा विवाह सोहळा वैदिक विवाह पद्धतीने झाला. मात्र, याठिकाणी 50पेक्षा जास्त लोक उपस्थित राहिले. यामुळे नियमाचे उल्लंघन झाल्याने मंगल कार्यालय, विवाह करुन देणाऱ्या संस्थेवरही आर्थिक दंडाची करवाई होणार आहे, अशी माहिती उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे यांनी सांगितले.
- लग्नाच्या कंदोरीसह जेवणाला जाणारे झाले क्वारंटाईन -
या प्रकरणात प्रशासनाच्या वतीने पहिल्यांदा दोन कंटेनमेंट झोन तयार करावे लागले आहे. यात विवाह सोहळ्यात दोन भागातील कुटुंब आहे. एक झोन हा कोरोनाबाधित आढळलेल्या घराजवळच्या 33 घरातील लोकांचा आहे. यात 126 लोकांचा समावेश आहे. तर यासोबतच नंदनवन परिसरातील 8 घरातील नागरिकांना कंटेनमेंट झोनमध्ये राहावे लागणार आहे.
यासोबतच पिपरी मेघे परिसरातील 33 हजार नागरिकांना तीन दिवस संचारबंदीत राहावे लागणार आहे. या कुटुंबाच्या संपर्कातील 30 जण हे हाय रिस्कमध्ये असल्याने त्यांना कोविड सेंटरला हलवण्यात आले आहे. यांच्यासह जवळपास 70 ते 80 जण लो-रिस्कमध्ये आहेत. यांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. यांना गृहविलगीकरणात ठेवावे लागणार आहे. यामध्ये लग्न समारंभात जेवायला जाणाऱ्यांचा समावेश आहे.
- पुढील लग्नसोहळ्याच्या अडचणीत झाली वाढ -
पूर्वी केवळ एका परवानगी घेऊन लग्न सोहळे पार पाडत होते. या लग्नात झालेल्या नियम मोडल्याने पुढील काळात हे लग्न सोहळे अडचणीत सापडणार आहे. यामुळे पुढील काळात 50 जणांची परवानगी घेताना बाहेर जिल्ह्यातून 10पेक्षा जात लोकांना येता येणार नाही. यासह आता 50 जणांची यादी आधारकार्ड आणि डॉक्टरांचे फिटनेस सर्टिफिकेट जोडावे लागणार आहे. बाहेर जिल्ह्यातून आलेल्यांना विलगीकरणात राहावे लागणार आहे. लग्न सोहळा बाहेर जिल्ह्यात झाल्यास वर मंडळीनासुद्धा इथे आल्यावर गृहविलगीकरणात राहावे लागणार आहे.
- लग्नसोहळा होताना पथक नजर ठेवणार -
यापुढे होणाऱ्या विवाह समारंभात नियमांचे पालन होते को नाही हे पाहण्यासाठी महसूल पोलीस आणि नगर परिषद, तथा ग्रामपंचायत सोबतीला आरोग्य विभागाचे पथक लग्न समारंभात असणार आहे. विवाहात लोक नियमांचे उल्लंघन करत आहेत का? यावर हे पथक लक्ष ठेवून असणार आहे. नियम मोडल्याचे आढळल्यास आर्थिक दंड, फौजदारी स्वरुपाची कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलीस प्रशासनाकडून देण्यात आला आहे.
दरम्यान, या पत्रकार परिषदेला उपविभागीय पोलीस अधिकारी पियुष जगताप, तालुका आरोग्य अधिकारी माधुरी बोरकर, बीडीओ इसाये, नायब तहसीलदार स्वप्नील डीगलवार आदी उपस्थित होते.