वर्धा - आर्वी मार्गाच्या चौपदरीरणाचे काम सध्या सुरू आहे. मध्यरात्री दरम्यान महामार्गावर यंत्राच्या सहाय्याने रस्त्यावर मुरूम पसरविण्याचे काम सुरू होते. यावेळी मुरुमाच्या ढिगाऱ्यावर झोपलेले दोन मजूर ग्रेडर मशीनच्या खाली आल्याने गंभीर जखमी झाले. मात्र, उपचारादरम्यान या दोघांचा मृत्यू झाला. ही घटना आज पहाटे आंजी जवळील पेट्रोलपंपजवळ घडली आहे. विठ्ठल भुजाडे आणि विलास दोंडीलकर असे मृत मजुरांची नावे आहेत.
त्रिवेणा कन्स्ट्रक्शन कंपनीला महामार्गाच्या निर्मितीचे कंत्राट देण्यात आले आहे. उन्हाळ्यामुळे प्रचंड तापमान असल्याने दिवसा या रस्त्याचे काम करताना अडचण निर्माण होत आहे. यामुळे रात्रीच्यावेळी रस्त्यावरील मुरुमाचे ढिगारे पसरविण्याचे काम सुरू होते. या ठिकाणी मजूर म्हणून काम करणारे विठ्ठल भुजाडे आणि विलास दोंडीलकर हे रात्रीच्यावेळी मार्गावरील मुरुमाच्या ढिगाऱ्यावर झोपले होते. पहाटे दरम्यान रस्त्यावर मुरूम पसरवण्याचे काम सुरू असताना ग्रेडरमशीखाली आल्याने दोघे मजूर गंभीर जखमी झाले. त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
घटनेनंतर ग्रेडर चालक घटनास्थळापासून फरार झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच खरांगणा ठाणेदार संतोष शेगावकर यांनी घटनास्थळ गाठत तपासाला सुरुवात केली. पोलिसांनी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. कंपनी प्रशासनावरही कारवाईचे संकेत दिले जात आहेत.