वर्धा- ग्रामीण भागातील अर्थकारणात दुग्ध व्यवसायाची महत्वाची भूमिका आहे..मात्र लॉकडाऊनच्या काळात दूध उत्पादन तग धरुन असला, तरी त्याचा फटका दुग्धजन्य पदार्थ निर्मिती आणि विक्रीच्या व्यवसायाला बसला आहे. दुग्ध उत्पादनांवर अवलंबून असलेले शेतकरी, दूध उत्पादक संस्था देखील आर्थिक संकटात सापडल्या आहेत. वर्धा जिल्ह्यातील गो-संवर्धन गोरस भंडारला यामुळे जवळपास 45 लाख रुपयांचा तोटा झाला आहे. दूध उत्पादक शेतकरी आणि गोरस भंडार यांच्यासमोर निर्माण झालेल्या अडचणींचा आढावा ईटीव्ही भारतने घेतला आहे.
गोसेवेच्या उद्देशातून महात्मा गांधी आणि जमनालाल बजाज यांनी वर्ध्यात 1939 साली गोरस भंडारची स्थापना केली. 10 ऑक्टोबर 1961 मध्ये ही संस्था सहकारी तत्वावर नोंदवण्यात आली. आज ही संस्था गो-संवर्धन गोरस भंडार या नावाने ओळखली जाते. गोरस भंडार शहरा लगतच्या शेतकऱ्यांच्या जोडधंद्यातील गायीच्या दूध विक्रीचे हक्काचे विक्री केंद्र आहे. येथे दिवसातून दोन वेळा दुधाची खरेदी विक्री केली जाते. दूध विक्रीसह दुधापासून 17 प्रकारच्या दुग्धजन्य पदार्थांची निर्मिती केली जाते. लॉकडाऊनमध्ये जवळपास 11 दिवस दुपारची विक्री बंद राहिली. दूध विक्री सोबतच उत्पादनांना ग्राहक मिळाला नसल्याने गोरस भंडारला मोठा आर्थिक फटका सोसावा लागला आहे.
ग्रामीण भागातील दूध उत्पादकांचे हक्काचे ठिकाण...
गोरस भंडारसोबत जवळपास 15 दुग्ध संकलन संस्थांचे 760 दुग्ध उत्पादक जोडलेले आहेत. गोरस भंडार येथे विविध विभागात कार्यरत पदाधिकारी, घरो घरी जाऊन दूध वाटणारे कर्मचारी, बेकरी, दुगधजन्य पदार्थ निर्मितील कर्मचारी असे 1 हजार जण यांसस्थेवर अवलंबून आहेत. लॉकडाऊनचा फटका बसल्यामुळे सरासरी 5 हजार लोकांचे अर्थकारण प्रभावित झाले आहे. वर्षाला 27 कोटींच्या घरात उलाढाल असणारे गोरस भंडार लॉकडाऊनमुळे तीन ते चार महिन्यात 45 लाख रुपयांने तोट्यात असल्याची माहिती संस्थेचे सचिव माधव कडू यानी ईटीव्ही भारतशी बोलतांना दिली.
शहरातील 12 गोरस भंडार केंद्रातून होणारी विक्री घटली...
गोरस भंडारची शहरात 12 विक्री केंद्र आहेत. या केंद्रामधून कच्चे दूध, गोड गरम केलेले दूध, बसण्याची व्यवस्था आहे. ब्रेड, गोरसपाक, पेढा विक्री केली जात होती. यासह बासुंदी, तूप, श्रीखंड, खवा पनीर असे 17 पदार्थ विक्री केले जायचे. मात्र, लॉकडाऊनमुळे केवळ कच्चे दूध विक्रीस जात आहे. इतर पदार्थांची मागणी निम्यावर आल्याचे गोरस भंडार रामनगरचे चालक रघुनंदन खडतकर यांनी ईटीव्ही भारताला सांगितले.
तोटा वाढत असल्याने जनावरे विकावी लागली...
कोरोनाच्या भीतीने लॉकडाऊन झाले. यामुळे हॉटेल, चहा टपरी, लग्न समारंभ यावर परिणाम झाला. त्याचा परिणाम दूध आणि दुग्धजन्य पदार्थ खरेदी विक्रीवर झाला. ज्यामध्ये दही ताक पनीरची मागणी घटली. नागठाणा येथील शेतीसोबत जोडधंदा मधून दूध उत्पादनाचा व्यवसाय करणारे गजानन लोखंडे यांच्याकडे 26 गायी होत्या. यासह इतरांकडून संकलित केलेले असे मिळून 200 ते 250 लिटर दूध विक्रीस नेत असत. लॉकडाऊनमुळे गोरस भंडारने तोटा कमी करण्यासाठी 38 रुपये गायीचा दुधाचा दर दोन रुपयांनी कमी करत 36 रुपये केला. दूध जास्त घेऊ शकत नसल्याने तो फटका बसला. पण कुटार, चारा ढेप, कोरोनामुळे मजूरी महागली. यामुळे महिन्याला मिळणारा नफा जाऊन तोटा व्हायला सुरुवात झाली. जनावरे विकून हा तोटा कमी करण्याचा प्रयत्न केल्याचे लोखंडे यांनी सांगितले.
गो-संवर्धन गोरस भंडारमध्ये केवळ गायीच्या दुधाची खरेदी विक्री होते. गोसेवेचे उद्दिष्ट घेऊन उभ्या राहिलेल्या संस्थेला 80 वर्षांचा काळ लोटला आहे. मात्र, यावर्षी लॉकडाऊन दूध आणि दुग्धजन्य पदार्थांचा व्यवसाय अर्ध्यावर आला आणि तोटा झाला. यातून सावरण्यासाठी गोरस भंडारची गरम दुध विक्री करणारी दुकाने खुली झाली तर या तोट्यातून सावरण्यास मदत होईल असे सांगितले जात आहे.