वर्धा- समुद्रपूर तालुक्यातील हरणखुरी शिवारातील शेतात दुर्दैवी घटना घडली. पिकाच्या संरक्षणासाठी लावलेल्या विद्युत प्रवाहाच्या स्पर्शाने शेतकऱ्याच्या 14 वर्षीय मुलाचा जीव गेला. प्रज्वल निलेश मेश्राम असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. विद्युत प्रवाह सुरू ठेवणाऱ्या रामचंद्र मुळे या शेतकऱ्याला पोलीस कोठडीत जाण्याची वेळ आली.
समुद्रपूर तालुक्यातील हरणखुरी शिवारात निलेश मेश्राम आणि रामचंद्र मुळे यांचे शेत आहे. आजूबाजूला जंगल परिसर असल्याने जंगली श्वापदांचा त्रास होत असतो. सकाळी निलेश मेश्राम शेतामध्ये माकडे हाकलण्यासाठी आले. दुपारी ते घराकडे निघून गेले. यामुळे प्रज्वल हा शेतात माकडे हाकलून लावण्यासाठी गेला.
दरम्यान, शेजारचे शेतकरी रामचंद्र मुळे यांनी जंगली जनावरांपासून पिकाचे संरक्षण करण्यासाठी तारांच्या कुंपणाला वीज प्रवाह सोडलेला होता. यावेळी आंब्याच्या झाडावर माकड बसून असल्याने प्रज्वल माकड हाकलण्यासाठी रामचंद्र मुळे शेताकडे गेला. यावेळी प्रज्वलचा विद्युत तारेला स्पर्श झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. रामचंद्र मुळे हे शेतात गेले असता प्रज्वल मृत्युमुखी पडलेला दिसला. काळे यांनी त्यांच्यावर नाव येऊ नये म्हणून प्रज्वलचा मृतदेह सुनील मेश्राम यांच्या धुऱ्यावर नेऊन ठेवला.
या घटनेची माहिती सुनील मेश्राम यांनी गावातील विद्युत कर्मचारी सतारे यांना दिली. यानंतर घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी भीमराव टेळे, ठाणेदार हेमंत चांदेवार यांच्यासह पोलीस पथकाने घटनास्थळी जाऊन पाहणी केला. यात प्रज्वलचा मृत्यू रामचंद्र मुळे यांच्या शेतात झाल्याचे चौकशीत पुढे आले.
पोलिसांनी शेतकरी रामचंद्र मुळे यांना ताब्यात घेतले. प्रज्वलचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी हिंगणघाटच्या उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आला. या प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार हेमंत चांदेवार यांच्या मार्गदर्शनात धनंजय पांडे, उमेश हरणखेडे, राज ठाकरे करत आहे.