वर्धा - देशात संचारबंदी असल्यामुळे अनेक मजूर आहे तिथेच अडकले आहेत. काम बंद झाल्याने काय खायचे कुठे राहायचे, असे प्रश्न त्यांना भेडसावत आहे. अशातच राज्य आणि जिल्ह्याच्या सीमाही बंद असल्यामुळे पायी आपल्या गावी परत जायला निघालेल्या सुमारे चारशे मजुरांना वर्ध्यातच थांबवण्यात आले. प्रशासकीय स्तरावर बोलून त्यांचा वेतनाचा प्रश्न मिटवला. तेच वर्ध्यातील जय महाकाली शिक्षक संस्था आणि वैदकीय जनजागृती मंच या संस्थांनी सामाजिक दायित्व स्वीकारल्याने मजुरांच्या भाकरीचा प्रश्न सुटला आहे.
देशभरातील मजुरांचा आपल्या गावाकडे लोंढा निघाल्याचे चित्र अनेक ठिकाणी दिसत आहे. वर्धेतही समृद्धी महामार्गावर 400 मजूर काम करत होते. पण, कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सर्व देशभर 15 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्याचा परिणाम समृद्धी महामार्गाच्या कामावरही झाला आहे. या महामार्गाच्या निर्माण कार्यासाठी उत्तरप्रदेश, बिहार, मध्यप्रदेश, आणि राजस्थान या राज्यातून आले होते. काम थांबल्यामुळे या मजुरांच्या रोजगार आणि वेतनाचा प्रश्न निर्माण झाला. त्यातच राज्य आणि जिल्ह्याच्या सीमा बंद झाल्यामुळे मजूर पायी आपापल्या गावी जायला निघाले.
ही माहिती जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांना मिळताच सेलू तालुक्यातील सेलडोह येथे उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे, सेलू तहसीलदार महेंद्र सोनवणे यांनी धाव घेतली. महाकाली शिक्षण संस्थेचे सचिन अग्निहोत्री आणि वैद्यकीय जनजागृती मंचचे डॉ. सचिन पावडे यांना मिळताच ते तिथे पोहचले. सर्व मजुरांची समजूत काढण्यात आली. तसेच समृद्धीचे व्यवस्थापक निशिकांत सुके यांच्याशी मजुरांचे वेतन मिळण्यासाठी चर्चा करण्यात आली. त्यांनी संबंधित कंत्राटदारांशी चर्चा करून चार दिवसात पगार देण्याची व्यवस्था केली. तालुका आरोग्य अधिकारी यांनी सर्व मजुरांची आरोग्य तपासणी केली. तसेच सेलू तहसीलदार यांनी प्रत्येक कॅम्पमध्ये तांदूळ देण्याची व्यवस्था केली.
डॉ. सचिन पावडे व सचिन अग्निहोत्री त्यांच्या पथकासह उपस्थित होते. त्यांनी 100 कुटुंबाला पुरेल एवढे स्वयंपाकाला आवश्यक तेल, डाळ इत्यादी साहित्य वाटप केले. स्वयंपाकाची चूल आणि भांडीकुंडी मजुरांकडे होतीच. सेलडोह सरपंच यांनी त्यांना पाण्याची तसेच त्यांच्या परिसरात जंतूनाशक फवारणीची तयारी केली. परिसरातील हातपंप बंद असल्याने ते दुरुस्त करून देण्याची सूचना तहसीलदार सेलू यांनी केली.
हेही वाचा - 'नागरिकांनी सहकार्य करावे, अन्यथा...' आर्वीच्या उपविभागीय अधिकाऱ्याचा इशारा