वर्धा - मागील तीन दिवसात वर्ध्याच्या अनेक भागात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे. यामुळे नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. यामुळे जिल्ह्यातील सहा तालुक्यात अतिवृष्टीमध्ये झाली आहे. मासेमारीसाठी गेलेला व्यक्ती वर्धा नदीच्या पात्रात वाहून गेला होता. ही घटना 30 जुलै रोजी सायंकाळी घडली. अखेर काल (गुरूवार) दोन दिवसांनी त्याचा मृतदेह आढळून आला. लक्ष्मण शिवरकर असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
देवळी तालुक्यातील अंदोरी येथील मच्छीमार लक्ष्मण शिवरकर वर्धा नदीच्या पात्रात मासे पकडायला गेला होता. कंबरेला पकडलेल्या मासोळ्याचे गाठोडे बांधले होते. अचानक नदीपात्रात पाण्याचा प्रवाह वाढल्याने काही कळायच्या आत तो वाहून गेला होता. कंबरेला पन्नास किलोच्या जवळपास वजनाचे गाठोडे असल्याने मृतदेह शोधण्यात बराच अडथळा निर्माण झाला होता. त्यामुळे नागपूर येथील एसडीआरएफच्या पथकाला बोलवण्यात आले होते. अखेर पथकाला दोन दिवसांनी अंदोरीच्या शिवारात लक्ष्मण शिवरकर याचा मृतदेह आढळून आला. मृतदेह बोटच्या साहाय्याने बाहेर काढण्यात आला. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. देवळी पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद आहे.