वर्धा - समुद्रपूर तालुक्यातील लसनपूर येथे मध्यरात्री लागलेल्या आगीत दोन गोठे जळून खाक झाले. ही आग मध्यरात्री 1 वाजताच्या सुमारास लागली असून आगीचे कारण अद्याप कळू शकले नाही. यामध्ये शेती उपयोगी ठेवून असलेले साहित्य जळाल्याने शेतकाऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले. पुढील हंगामासाठी लागणारे साहित्य जळून खाक झाल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले.
लसनपूर येथे गावापासून काही अंतरावर शेतकऱ्यांचे गोठे आहेत. यात एका गोठ्याला लागलेल्या आगीच्या कारणाचा शोध घेतला जात आहे. यानंतर वैरण, शेती साहित्य लाकुडफाटा आदी साहित्य असल्याने आगीने लगतच्या गोठ्याला कवेत घेत दोन गोठयापर्यंत ही आग पसरली. काहींच्या हे लक्षात येताच गाव जागे झाले. लोकांनी मिळेल त्या पद्धतीने पाणी टाकून आग विझवण्याचा पर्यंत केला. तसेच प्रशासनाने माहिती मिळताच अग्निशामक बंब बोलावून आगीवर पाण्याचा मारा करण्यात आला. आगीवर जवळपास चार तासाने नियंत्रण मिळवण्यात यश आले.
शेतकरी अजाबराव येलमुले, नारायण रायफुलें, भारत पोले यासह एक अशा एकूण चार शेतकऱ्यांच्या गोठ्यात स्प्रिंकलर, शेती साहित्य वखार, प्लॅस्टिक पाईप जळून खाक जळल्याचे सांगितले जात आहे. तलाठ्यांकडून पंचनामा करण्यात आला असून प्राथमिक अंदाजानुसार तीन लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याचे तहसीलदार राजू गणवीर यांनी सांगितले.