वर्धा - भरारी पथकाकडून देवळी तालुक्याच्या पुलगाव, गुंजखेडा तसेच हिवरा (हाडके) परिसरातून अवैध वाळूसाठा जप्त करण्यात आला. २ ट्रॅक्टर आणि इतर साहित्य यावेळी जप्त करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हास्तरीय पथकाकडून देण्यात आली.
जिल्हास्तरीय पथकाला पुलगाव, गुंजखेड हिवरा (हाडके) परिसरात अवैध वाळू उत्खनन, वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली. भरारी पथकाकडून तपास मोहिम राबविण्यात आली. या पथकात नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी आणि तलाठ्यांच्या समावेश होता. पथकाने धाड टाकत 'एमएच ३२ ए ५५०२' आणि 'एमएच ३२ एएच ०६३५' क्रमांकाचे ट्रॅक्टर, एमएच ३२ ए ९४६५ क्रमांकाची ट्रॉली आणि वाळू जप्त केली.
गुंजखेडा येथील वर्धा नदी पात्रालगत १५ ते २० ब्रास वाळूसाठा, पुलगाव येथील वल्लभनगरच्या कॉटन मील परिसरातील लेआऊटजवळ ७ वेगवेगळ्या ठिकाणांहून २०० ब्रास आणि याच भागात इतर ठिकाणी मिळून ५२० ब्रास, गुंजखेडा शिवारातल्या जोशी प्लॉटच्या वेगवेगळ्या भागात अंदाजे ५० ब्रास, पुलगावच्या मंगल कार्यालयाच्या पार्कींग परिसरात अंदाजे ४०० ब्रास वाळूसाठा जप्त केला. यापुढेही जिल्हास्तरीय भरारी पथकाकडून इतर तालुक्यातही अशी कारवाई केली जाईल, असे खणिकर्म विभागाचे अधिकारी डॉ. इम्रान शेख यांनी सांगितले.