वर्धा - महाशिवरात्रीनिमित्त वर्ध्यातील महादेव मंदिरात भाविकांनी गर्दी केली आहे. हे मंदिर ३०० वर्षे जुने असल्याचे सांगण्यात येते. हेमाडपंती बांधकाम असणाऱ्या मंदिराचे भाविकांना विशेष आकर्षण आहे. आज सकाळी कावड यात्रेतून आणलेल्या पाण्याने महादेवाचा जलाभिषेक करण्यात आला. त्यानंतर मंदिराच दरवाजे भक्तांसाठी खुले करण्यात आले.
दरवर्षी महाशिवरात्रीला या मंदिरात भाविक मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. बेलाचे पान, फुल वाहत पूजा करतात. मंदिराच्या वतीने भाविक भक्तांसाठी गर्दी होऊन अडचण होऊ नये म्हणून विशेष नियोजन केले जाते. पुरुषांची आणि महिलांची वेगवेगळ्या ठिकाणी रांगा लावण्यात येते. सभामंडपातून आतमध्ये गर्भगृहात दर्शनासाठी सोडले जाते. शिवपिंडीवर दुग्धाभिषेक, बेलाचे पान, फुल वाहत लोक महाशिवरात्रीची पुजा करतात.
दिवसभर मंदिरा परिसरात मोठी गर्दी पहायला मिळते. याची व्यवस्था लावणे आवश्यक असते. त्यामुळे याठिकाणी तगडा बंदोबस्त लावला जातो. तसेच, भाविकांसाठी फलहाराची व्यवस्था केली जाते.
महाशिवरात्री निमित्य कावड जलाभिषेक आणि भस्मपूजा
महाशिवरात्रीनिमित्य रात्री १२ वाजता पवनारच्या नदीपासून पायदळ कावड यात्रा काढत पाणी आणले जाते. याच पाण्याने जलाभिषेक केला जातो. दूध बिल्वपत्रे वाहत आरती केली जाते. त्यानंतर चार वाजल्यापासून लोकांसाठी हे मंदिर खुले केले जाते. मध्यरात्री १२ वाजण्याच्या सुमारास महाशिवरात्रीनिमित्त भस्म आरतीला लोक गर्दी करतात. दरवर्षी अशाच प्रकारे महाशिवरात्री साजरी केली जाते, अशी माहिती मंदिराच्या वतीने अनिल नासणांनी यांनी ईटीवी भारतशी बोलताना दिली.