वर्धा - सेवाग्राम पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या करंजी (भोगे) जवळील सोंडलापूर शिवारात पिता-पुत्राचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली. दोघांनी गावठी दारू पिल्याने त्यांची प्रकृती खालावली. त्यांना उपचारासाठी सेवाग्राम रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या दोघांचा मृत्यू दारू पिल्याने झाल्याचा अंदाज डॉक्टरांनी वर्तवला असून शवविच्छेदन अहवालानंतरच नेमके कारण स्पष्ट होणार आहे.
सोंडलापूर येथील रामा कृष्णा सोयाम (६०) आणि अंकुश रामा सोयाम (२८) या दोन्ही पिता पुत्रांनी गुरुवारी रात्री घरी गावठी दारू आणून सेवन केली. शुक्रवारी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास त्यांनी पुन्हा दारू पिण्यास सुरूवात केली. मात्र, यानंतर त्यांची प्रकृती खालावली आणि ते बेशुद्ध पडले. गावातील एकाला याची माहिती मिळताच त्यांने गावकऱ्यांच्या मदतीने दोघांना सेवाग्राम रुग्णालयात उपचारासाठी नेले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांनतर शवविच्छेदन करण्यात आले. रक्ताचे नमुने तसेच विसेरा काढण्यात आला आहे. प्राथमिक अंदाज पाहता या दोघांचाही मृत्यू दारूमुळे झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
सेवाग्राम पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करत अकस्मात मृत्यूची नोंद केली. शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होणार आहे. पोलिसांनी पिता-पुत्रांनी दारू पिलेली बाटली ताब्यात घेतली आहे. शवविच्छेदनाच्या अहवालानंतरच दोघांचा मृत्यू दारू पिल्याने झाला, की विषारी दारू पिल्याने हे स्पष्ट होणार आहे, अशी माहिती सेवाग्राम पोलिसांच्या वतीने देण्यात आली आहे.
जिल्ह्यात दारूबंदी असली तरी 'दारू' 'बंदी' असे विनोदाने सांगितले जाते. याचे कारण म्हणजे पिणाऱ्यांची संख्या आणि विकणाऱ्याची संख्या १९७५ पासून म्हणजे ४४ वर्षांत घटण्याऐवजी वाढली आहे. यात आता देशी-विदेशी आणि हात भट्टीवर तयार होणारी गावठी दारू विक्री होते. मात्र, दारू बंद झाल्याचे अद्याप दिसून आले नाही. रोज पोलीस ठाणे डायरीवर दारू पकडल्याची नोंद होते. मात्र, असे असूनही दारू विक्री कमी झाल्याचे दिसत नाही.