वर्धा - खरांगणा येथे भव्य गवळाऊ प्रदर्शन भरवण्यात आले होते. यामध्ये ३ गटात स्पर्धा भरवण्यात आली. यामध्ये अडिचशेच्यावर गवळाऊ वंशाच्या जनावरांनी सहभाग घेतला. त्यापैकीच एका गाईची दोन लाख रुपये किंमतीमध्ये मागणी करूनही गोपालकाने ही गाय विकण्यास नकार दिला. याच गाईने या प्रदर्शनामध्ये पहिला क्रमांक पटकावला आहे.
जिल्हा परिषदेच्या पशू संवर्धन आणि पंचायत समितीच्यावतीने पशूप्रदर्शनामध्ये दुग्धस्पर्धेचे आयोजन केले होते. यामध्ये विदर्भातील गोपालकांनी आपल्या गवळाऊ गाईंसह सहभाग घेतला होता. यामध्ये गाय गटात भोजराज अरबट यांच्या गाईने प्रथम पुरस्कार पटकावला आहे. ही गाय जवळपास ५ वर्षांची असून आतापर्यंत सुमारे 2 लाख 29 हजारांची बक्षिसे या गाईने जिंकली आहेत. ही गाय दिसायला पांढरी शुभ्र, उंच माथा, बदामी आकाराचे डोळे आणि शरीराने काटक आहे. लहान होती तेव्हापासूनच या गाईने राज्यपातळीवरच एक लाखांचे बक्षीस पटकावले.
प्रदर्शनामध्ये देखील या गाईची तब्बल दोन लाख रुपयांना मागणी झाली. मात्र, भोजराज अरबट यांनी ही गाय विकण्यास नकार दिला. गवळाऊ गायीचे जतन करत त्यापासून आणखी वासरू तयार करायची असल्याचे अरबट यांनी सांगितले.
खरांगणा येथे आमदार दादाराव केचे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष सरित गाखरे, सभापती मुकेश भिसे यांच्यासह अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बक्षीस देण्यात आले. वळू गटात चॅम्पियन ऑफ शोचा पुरस्कार अभिषेक मुरके यांच्या वळूला, तर गवळाऊ गाय गटात चॅम्पियन ऑफ शोचा पुरस्कार भोजराज अरबट यांच्या गवळाऊ गायीला मिळाला. यावेळी गवळाऊ जनावरांच्या संवर्धनाचे महत्त्व उपस्थितांनी अधोरेखीत केले.
गायीपासून मिळणारे उत्पन्न आणि लागणारा खर्च -
गायीपासून सात महिने रोज किमान नऊ लिटर दूध मिळते. हे दूध ६० रुपये प्रती लिटरने विकले जाते. त्यामधून रोज ५४० रुपये, तर महिन्याला १६ हजार २०० रुपये मिळतात. गाईला वर्षाकाठी ६० ते ७० हजार रुपयांचा खर्च येतो. यामधून अरबट यांना काही नफा मिळतो. वर्षभरात मिळणारी बक्षिसे, वासरे यामुळे सर्व खर्च निघतो. गाय ही गोपालकाची माय अशी म्हण प्रचलित आहे. पण ही म्हण खरी करून दाखवणारे भोजराजसारखे गोपालकही आहेत. यामुळे येत्या काळात गवळाऊचे संगोपन होईल यात शंका नाहीच.