वर्धा - जिल्ह्यातील आर्वी येथे संपत्तीच्या वादातून काकानेच पुतण्याच्या जिनिंग व्यवसायाला आग लावल्याची धक्कादायक घटना घडली आहे. एवढेच नाही तर पुतण्याला जीवे मारण्याच्या प्रयत्न केला. मात्र, पुतण्याने पोलीस स्टेशनच्या दिशेने धाव घेतल्याने थोडक्यात जीव वाचला. रविवारी ही घटना घडली असून यात पोलिसांनी एकाला अटक केली आहे. दीपक देशमुख असे आरोपीचे नाव आहे तर कौस्तुभ उर्फ गौरव किशोर देशमुख असे पुतण्याचे नाव आहे.
जिनिंग जाळून टाकली
गौरव देशमुख याचे वडील किशोर देशमुख आणि दीपक देशमुख यांच्या संपत्तीच्या वाद आहे. यात संपतीच्या वादातून दीपक देशमुख रविवारी गौरव याचा देउरवाडा रोडवर स्थित जिनिंगमध्ये एकाला सोबत घेऊन गेला. यावेळी त्याच्या हातात पेट्रोल आणि हातात तलवार होती. गौरवला तलवारीचा धाक दाखवत कापूस, सरकी कापसापासून निर्मित गठान यावर दीपक आणि त्यांच्या सहकाऱ्याने पेट्रोल टाकून दिले. या आगीत जिनिंगचा कोळसा झाला. यात ४६ लाखांचा कापूस आणि इतर साहित्यांचे नुकसान झाले आहे.
पुतण्यालाही जिवंत जाळण्याचा प्रयत्न
दीपक एवढ्यावरच थांबला नाही तर त्यांनी आपला पुतण्या गौरवच्या अंगावर पेट्रोल टाकून त्याला पेटवण्याचाही प्रयत्न केला. यात गौरवने कशी बशी सुटका करत आर्वी पोलिस स्टेशनकडे धाव घेतली म्हणून तो वाचला. हा सगळा प्रकार पोलिसांच्या कानावर घालताच पोलिसांनी घटनास्थळ गाठले आणि दीपक देशमुखला अटक केली. दीपक सोबत असणारा त्याचा सहकारी बाबू नासरे मात्र, फरार झाला.
जिनिंग उभारणीसाठी काढले होते खाजगी बँकेतून कर्ज....
गौरवने कापसाची जिनिंग टाकण्यासाठी खासगी बँकेतून १६ लाखांचे कर्ज घेतले होते. मात्र, काकाने पेट्रोल टाकून जिनिंग जाळल्याने त्याचे जवळपास ४६ लाखांचे नुकसान झाले असल्याचे सांगाण्यात येत आहे. यावेळी त्याचा मोबाईलही पेटल्या आगीत फेकून दिल्याचे तक्रारीत म्हणटले आहे.