वर्धा - अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर गुरुवारी 4 कोरोना रुग्णांना घरी पाठवण्यात आले. त्यामुळे वर्धा जिल्हा कोरोनामुक्त जिल्हा झाला होता. मात्र, गृह विलगीकरणात असलेल्या आर्वी तालुक्यातील वर्धामनेरी येथील एका कुटुंबातील 52 वर्षीय व्यक्तीचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह प्राप्त झाला. प्रशासनाने त्या व्यक्तीला तात्काळ सेवाग्राम कोविड रुग्णालयात उपचारासाठी हलवले आहे.
गृह विलगीकरणात असलेले कुटुंब हे मूळचे लातूरचे असल्याचे पुढे येत आहे. याच कुटुंबातील मुलगा हा 18 मे रोजी दिल्ली येथून आलेला होता. तसेच मुलगी महिन्याभरापूर्वी नागपूर येथून आली असल्याची माहिती आहे. दिल्लीवरून आलेल्या मुलामध्ये कोणतीही लक्षणे आढळली नाहीत. तथापि, त्याच्या वडिलांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याने त्यांना सेवाग्राम रुगणालयात हलवण्यात आले.
या कोरोनाबाधित व्यक्तीच्या संपर्कातील लोक शोधून त्यांना उपजिल्हा रुग्णालयात विलगीकरणात ठेवण्यात येणार असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संगीता झोपाटे यांनी दिली.
प्रशासकीय आणि आरोग्य विभागाचे अधिकारी कर्मचारी गावाला भेट देऊन माहिती घेऊन कंटेंनमेंट झोन जाहीर करण्याबाबत निर्णय घेणार आहेत.