वर्धा - भाजपच्यावतीने काढलेली महाजनादेश यात्रा गुरुवारी वर्ध्यात मुक्कामी होती. दौऱ्यात नमूद नसले तरी आज मुख्यमंत्री सेवाग्राम आश्रमाला भेट देतील. त्यामुळे आश्रमच्यावतीने स्वागताची तयारी करण्यात आली. मात्र, मुख्यमंत्री सेवाग्राम आश्रमाला गेलेच नाहीत. त्यामुळे आश्रमवासी मुख्यमंत्र्यांच्या प्रतिक्षेतच राहिले अन् बापूंचा जनादेश न घेताच मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा पुढे निघाली.
यंदा महात्मा गांधीजींची १५० वी जयंती साजरी होत आहे. त्यासाठी सरकारकडून वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा गुरुवारी वर्ध्यात पोहोचली. मुख्यमंत्री स्वतः वर्ध्यात मुक्कामी होते. त्यामुळे यात्रेच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात सेवाग्राम आश्रमाला भेट देऊन करतील असे सर्वांना वाटत होते. पोलिसांनी देखील मुख्यमंत्री येणार असल्याचे रात्रीच कळवले होते. त्यामुळे आश्रम प्रतिष्ठानच्यावतीने तयारी करण्यात आली होती. मात्र, मुख्यमंत्री आश्रमाकडे फिरकलेच नाहीत.
सेवाग्राम आश्रमाची भेट दौऱ्यात नियोजित नव्हती, असे पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली सांगतात. मात्र, एकीकडे गांधीजींच्या १५० व्या जयंतीनिमित्त भरगच्च कार्यक्रमांची रेलचेल आहे, तर दुसरीकडे खुद्द मुख्यमंत्री वर्ध्यात मुक्कामी असतानाही सेवाग्राम आश्रमाकडे पाठ फिरवली. त्यामुळे विरोधकांना टिके करण्यासाठी आयत कोलीतच मिळाले असेच दिसून येते.