वर्धा - बुटीबोरी-तुळजापूर या महामार्गाच्या चौपदरीकरण आणि सिमेंटीकरणाचे काम सुरू आहे. या महामार्ग बांधकामात अडथळा ठरणारे घरांचे अतिक्रमण पोलीस बंदोबस्तात काढण्यात आले. सेलडोहच्या परिसरात जवळपास ३० ते ४० घरे अडसर ठरत होती. यातील काहींनी स्वतःहून घरे पाडले. तर काहीचे अतिक्रण आज जेसीबीच्या सहाय्याने पाडण्यात आले.
सेलडोह येथील ३० ते ४० घरे ही महामार्ग रुंदीकरणाचे कामात अडसर ठरत होती. यासाठी त्यांना मोबदला देण्यात आला आहे. तसेच घरातील साहीत्य काढून स्थलांतर करण्यासाठी ६ महिन्यांचा कालावधी दिला होता. यातील काहींनी घरे रिकामीसुद्धा केली. पण यातील काहींना जमिनीचा मोबदला न मिळाल्याने काम रखडले आहे. प्रशासनाचा दिरंगाईने हे काम रखडल्याने घरे पाडू नये, अशी मागणी करण्यात येत होती.
अखेर आज पोलीस बंदोबस्तात जेसीबीच्या साह्याने घरे पाडण्यात आल्याने रोष व्यक्त करण्यात आला. कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक केसरीचंद खंगार यांच्या नर्सरीतील झाडे पाडण्यात आल्याने नुकसान भरपाईची मागणी होत आहे. आज झालेल्या कारवाईने रस्ता बांधकामाचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र, यात अनेकांचे घर पडल्याने अनेक आठवणी या रस्ता रुंदीकरणात पुसल्या गेल्या आहेत.
आज झालेल्या कारवाईला सेलू तहसीलदार महेंद्र सोनोने, ठाणेदार प्रल्हाद काटकर, सुरक्षा अधिकारी वर्धा, सिंदी ठाणेदार हेमंत चांदेकर, पीएसआय रामकृष्ण भाकरे, तलाठी मानकर आणि मंडळ अधिकाऱ्यांसह मोठा फौजफाटा या काईवाई दरम्यान उपस्थित होता.