वर्धा: शशिकांत राऊत याने मंगळवारी गळफास लावून आत्महत्या केल्याची माहिती कुटुंबियांना देण्यात आली. बुधवारी त्याचे पार्थिव अहमदाबादवरुन विमानाने नागपूरला आणण्यात आले. त्यानंतर बीएसएफच्या वाहनाने पार्थिव गावात आणण्यात आले. यावेळी गांधीनगर बीएसएफचे असिस्टंट कमांडर संदीप राजपूत, उपनिरीक्षक सत्यविजय सिंग आणि बीएसएफच्या सहा जवानानी शशिकांतचे पार्थिवर गावात आणले.
गावात अंत्ययात्रा काढण्यात आली. यात गावातील पुरुषांसह महिलांची मोठी उपस्थिती होती. शशिकांतच्या जाण्याने गावात शोककळा पसरली आहे. यावेळी ‘अमर रहे, वंदे मातरम्’ च्या घोषणा देण्यात आल्यात. यावेळी चुलत भावाने मुख्याग्नी दिला. बीएसएफच्या पथकाने मानवंदना देऊन राष्ट्रध्वज कुटुंबियांच्या स्वाधिन केला. दोन मिनिट मौन पाळून सामूहिक श्रद्धांजली अर्पण केली. शशिकांत हा २० डिसेंबर २०११ ला बीएसएफमध्ये दाखल झाला.
शशिकांत चा विवाह चार वर्षांपूर्वीच झाला होता. आई-वडील, पत्नी, अडीच वर्षाचा मुलगा, मोठा भाऊ, वहिनी व बहीण असा आप्त परिवार आहे. ते याच महिन्यात २४ जूनला शशिकांतकडे गांधीनगराला जाणार होते. त्याकरिता रेल्वेचे तिकिटही काढले होते. पण भेट होण्यापूर्वीच दुर्घटना घडली. त्यामुळे शशिकांत हा आत्महत्या करू शकत नाही, तर त्याच्या घातपातची शक्यता असल्याने चौकशी करण्याची मागणी कुटुंबियासह गावकऱ्यांनी केली आहे. यात कुटुंबीय वरिष्ठ पातळीवर तक्रार देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.