वर्धा - वर्धा तालुक्यातील वायगाव बोरगाव आलोडा रस्ता जीवघेणा ठरत आहे. मागील एक वर्षपासून येथील रस्ता खचत चालला आहे. मात्र, याकडे दुर्लक्ष केले जात आहे. पावसाळ्याच्या दिवसात हा रस्ता केव्हाही जीवघेणा ठरू शकतो. त्यामुळे याकडे जिल्हा परिषद प्रशासन लक्ष देईल का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
वायगावकडून बोरगाव आलोडाकडे जाणारा रस्ता पूर्णपणे खचलेला आहे. तसेच पुलालगतचा भाग भर पावसाच्या पाण्याने वाहून गेल्याने रस्ता एक काठ पूर्णतः खचला आहे. याठिकाणी वर्षभरापूर्वीच सिमेंट काँक्रीटची भिंत उभारली. मात्र, त्यानंतरही परिस्थिती जैसे थे आहे. वारंवार सांगूनही याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप गावकरी करत आहेत.
गावातील लोक नाईलाजाने या रस्त्यावरून जीव मुठीत घेऊन वाहतूक करत आहेत. तर काहीजण उलट फेऱ्याने अधिकचे अंतरावरुन जाणे पसंत करतात. यामुळे या जीवघेण्या रस्ताचे यंदाच्या पावसात अधिक परिस्थिती खराब होणार आहे. रात्रीच्या वेळी अनोळखी व्यक्ती या रस्त्यावरून गेल्यास जीवितहानी होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे रस्ता दुरुस्त करावा, अशी मागणी शेतकरी वरखेडे यांनी केली आहे.
दरम्यान, एखाद्याचे जीव गेल्याशिवाय जागे न होणारे सरकारी यंत्रणा जीव जाण्याची वाट तर बघत नाही ना, असा संतप्त सवाल विचारला जात आहे.