वर्धा - जिल्ह्यातील वर्ध्याच्या रिंगरोडवर असलेल्या आलोडी शिवारात बोलेरोने दुचाकीला धडक दिल्याने अपघात झाला आहे. या अपघातात बोलेरो पेटून जळून खाक झाली. तर दुचाकी चालक विजय माजरखेडे हे गंभीर जखमी झाले आहेत.
वर्ध्यातील विजय माजरखेडे हे दुचाकीने (एमएच 32 व्ही 7593) जात होते. नागपूरकडून येत असलेल्या (एमएच 50 एसी 1351) बोलेरोने दुचाकीला आलोडी शिवारात सायंकाळी जबर धडक दिली. यात बोलेरो ही भरधाव असल्याने पलटी झाली. यात बोलेरोने पेट घेतल्याने चालक आणि आणखी एक जण बाहेर पडून स्वतःचा जीव वाचवत तिथून निघून गेले. पण, दुचाकीवरून फेकले गेल्याने विजय माजरखेडे हे जखमी झाले. त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले.
अपघात घडल्याने वाहतूक खोळंबल्याची माहिती सेवाग्राम पोलिसांना मिळाली. घटनास्थळी पोलीस कर्मचारी प्रकाश लसुंते, अभय इंगळे, किशोर साखरे, संजय बोबडे यांनी जाऊन वाहतूक नियंत्रित करत अपघाताची चौकशी केली. बोलेरो चालकाची माहिती कळू शकली नाही.
पुढील तपास सेवाग्राम पोलीस करत आहे. तर बोलेरोचा चारचाकी चालक आणि सहकारी हे घटनास्थळावरून वाहन सोडून गेल्याचे सांगण्यात येत आहे.