वर्धा: राजेश डफर हे वर्धा जिल्ह्यातील मात्र जळगाव येथे राहणारे युवा शेतकरी आहे. त्यांना आपल्या शेतीत नवनवीन प्रयोग करायला आवडतात आणि त्याचाच वसा घेत त्यांनी या काळ्या गव्हाला शोधून काढत त्याची लागवड शेतात केली. मोठ्या प्रमाणात पीक घेऊन त्यांची विक्रीही आता जोरदार सुरू आहे. लोकांना त्याचे फायदे समजल्यावर नागरिक स्वतः ते गहू घेण्यासाठी दुरदुरून येत असतात. पुष्कळ ठिकाणी विचारपूस केल्यानंतर त्यांना आकोट येथे हे बियाणे मिळाले. त्यांनी प्रारंभिक 40 किलो गहू आणून ते एक एकरमध्ये पेरले. आश्चर्य म्हणजे एक एकरात त्यांना 18 क्विंंटल काळ्या गव्हाचे उत्पादन झाले.
काळ्या गव्हाची वैशिष्ट्ये: काळा गहू हा कॅन्सर, मधुमेह, ताणतणाव, हृदयरोग, स्थूलता अशा अनेक व्याधींवर प्रभावी गुण देणारा आहे. या गव्हामध्ये अँटीऑक्सिडंट्स, 'बी' जीवनसत्त्व, फॉलिक अॅसिड, सेलेनियम, मॅग्नेशियम, मॅंगेनीज, जस्त, कॅल्शियम, लोह, तांबे, पोटॅशियम, फायबर आणि अमिनो अॅसिडचे प्रमाण आणि पोषकमूल्य जास्त प्रमाणात असते. शास्त्रज्ञांच्या माहितीप्रमाणे याला आपण समृद्ध, पौष्टिक आणि सकस आहारदेखील म्हणू शकतो. या गव्हात अॅन्थोसायनीनचे प्रमाण १४० पीपीएम असल्याने हा गहू काळा दिसतो.
उत्पादनाचे नवे स्त्रोत: अॅन्थोसायनीन हे अँटीऑक्सिडंट आहे. म्हणजेच ते रोगप्रतिकार शक्ती वाढविणारे आहे. कृषितज्ज्ञांच्या माहितीप्रमाणे ब्लूबेरी, जांभूळ या फळांमध्ये अॅन्थोसायनीनचे प्रमाण खूप जास्त असते. त्यामुळे या फळांचा रंग काळपट जांभळा असतो. अॅन्थोसायनीनमुळे फळांची पौष्टिकता वाढते. परंतु, जांभूळ आणि ब्लूबेरी वर्षभर उपलब्ध नसतात. काळ्या गव्हामुळे ही पौष्टिक तत्वे रोजच्या आहारातून अगदी सहज आपल्याला उपलब्ध होऊ शकतात. त्यामुळे वर्धा जिल्ह्यातील या शेतकऱ्यांने काळ्या गव्हाची लागवड करून आपल्याला मिळणाऱ्या उत्पन्नातून चांगली कमाई केली आहे. विदर्भातील शेतकऱ्यांसाठी काळ्या गव्हाचे उत्पादन हे उत्पन्नाचे नवे स्त्रोत ठरू शकते.
हेही वाचा: Aaditya Thackeray on Savarkar : राहुल गांधींनी सावरकरांबद्दल केलेल्या विधानावर आदित्य ठाकरेंनी स्पष्टच सांगितले; भूमिका आम्हाला...