वर्धा - कोरोनामुळे टाळेबंदी लागू झाल्याने रोजगार, उद्योग व व्यवसायावर परिणाम झाला आहे. अशातच वीज वितरण कंपनीने मार्च ते जून महिन्यात शुल्क वाढवून भरमसाठ बिल दिले. सरकार आणि वितरण कंपनीचा निषेध करण्यासाठी भाजप युवा मोर्चाच्यावतीने शहरात ‘भीक मांगो’ आंदोलन केले. या आंदोलनातून संघटनेने वीज बिल माफीची केली.
देशातील सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण महाराष्ट्रात आहेत. या महामारीमुळे अनेकांनी रोजगार गमाविला आहे. कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा, या मोठ्या संकटाला अनेकजण सामोरे जावे लागत आहे. वीज आकारातील दरवाढ आणि वाढीव बिल पाहून पैसे कुठून आणायचे, असा सामान्यांना प्रश्न पडला आहे.
भरमसाठ वीज देयक पाठवणार्या राज्य सरकारचा भारतीय जनता युवा मोर्चाने निषेध केला. या संघटनेचे जिल्हाध्यक्ष वरुण पाठक यांच्या नेतृत्वात पदाधिकार्यांनी शहरात फिरून भीक मांगो आंदोलन केले. आंदोलनात पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी दुकानदारांकडे झोळी पसरवून भीक मागितली.
युवा मोर्चा कार्यकर्त्यांनी बोरगाव येथील वीज कार्यालयात जाउन जमा केलेली रक्कम अधीक्षक अभियंता वानखेडे यांच्याकडे सुपूर्त केली. जिल्हा सह-संपर्क प्रमुख निलेश पोहेकर यांनी वानखेडे यांच्याकडे मागणीचे निवेदन दिले. यावेळी भाजप वर्धा शहर अध्यक्ष पवन परियाल, सरचिटणीस मंगेश मांगलेकर, प्रशांत झलके, युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस राहुल करंडे, गौरव गावंडे, जिल्हा उपाध्यक्ष अविनाश बाभुळकर, सचिव वैभव तिजारे, रितेश साठोने, किशोर हेमने, प्रसिद्धी प्रमुख विशाल उराडे, युवा मोर्चा मंडळ अध्यक्ष मोहित उमाटे, रजत शेंडे आदी पदाधिकारी उपस्थित होते