वर्धा - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे आमच्या कुटुंबातील महत्वाचे नेते आहेत. त्यामुळे, काही घोळ होऊ नये म्हणून त्यांचे नाव मृत्युपत्रात दिले असल्याचा खुलासा जाहीर कार्यक्रमात भाजपचे ज्येष्ठ नेते दत्ता मेघे यांनी केला. यावेळी त्यांनी गडकरीकडून देशभरात सुरू असलेल्या विकास कामांमुळे चेहरा मोहरा बदलला, असे म्हणत तोंडभरून कौतुक केले. यावेळी नितीन गडकरी त्यांच्या बाजूलाच बसून होते. वर्धा नगरपालिकेतील ई - भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते.
हेही वाचा - मोती नाला जलसंवर्धन प्रकल्पामुळे 'या' गावातील शेती झाली समृद्ध
दत्ता मेघे म्हणाले की, माझी प्रकृती ठीक नाही. पण, प्रेमाने बोलवल्याने मला कर्यक्रमाला यावे लागले. राजकीय कारकीर्दमध्ये 36 वर्षांत कोणतेही चुकीचे काम होऊ दिले नाही. सर्वच राजकीय पक्षांसोबत चांगले संबंध असल्याचेही मेघे म्हणालेत.
एकेकाळी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे निकटवर्तीय म्हणून सुद्धा दत्ता मेघे यांची ओळख आहे. पण, त्यांनी सध्याच्या घडीला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यावर असलेला विश्वास बोलून दाखवला. मृत्यूनंतर कुठलाही वाद किंवा घोळ होऊ नये यासाठी गडकरींचे नाव मृत्युपत्रात असल्याचे मेघे यावेळी बोलून गेलेत. त्यांनी आपल्या मृत्युपत्रात नाव का टाकले, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. याचे उत्तर सुमारे एक दशकांपूर्वीच्या काही घडामोडींमध्ये मिळत असल्याचे सांगितले जाते. त्यावेळी त्यांच्या घरात उफाळलेला वाद नितीन गडकरी यांच्या मध्यस्थीने सुटला, असे बोलले जाते. पणस, यावर दत्ता मेघे यांचे पुत्र समीर मेघे यांना विचारांना केली असता ते त्यांचा मनातील बोलून दाखवत, मन मोकळे केले असावे. त्यांच्या दोघांत मैत्रीपूर्ण विश्वास आहे. काही महिन्यांपूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही या संदर्भात एकदा बोलले असल्याची माहिती आमदार समीर मेघे यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना दिली.
विकास कामाने चेहरा मोहरा बदलला म्हणत केले कौतुक
देशातील विकास कामे झाली पाहिजेत यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे सातत्याने रात्रंदिवस मेहनत घेत आहेत. नागपूर, विदर्भ, महाराष्ट्रच नव्हे तर, देशातील अनेक राज्यांत विकासकामाने त्यांनी चेहरा मोहरा बदलून टाकला, असे म्हणत मेघे यांनी गडकरींचे कौतुक केले. अनेक वर्षे राजकारणात राहिलो, 20 वर्षे हाऊसमध्ये असताना अनेक नेते पाहिलेत, पण शब्द देऊन ते पूर्ण करण्याचे काम गडकरींनी केले ते कोणीही केले नसल्याचे मेघे म्हणालेत.
विरोधीपक्षातही त्यांचे स्वागत तेवढ्याच आदराने होते, ही बाब राजकीय कारकीर्दीत फार कमी लोकांच्या बाबतीत घडते. त्यांना शतायुष्य लाभो, समाजाचे अनेक महत्वाचे काम त्यांचा हातून घडो, असेही मेघे गडकरींबद्दल म्हणाले. यावेळी खासदार रामदास तडस, जिल्हा परिषद अध्यक्ष सरिता गाखरे, आमदार पंकज भोयर, नगराध्यक्ष अतुल तराळे, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
हेही वाचा - पैशाच्या उधारीतून एकाची हत्या; हत्येचा गुन्हा दाखल