वर्धा - जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग ७ वरील येरला शिवारातील गिमाटेक्स कंपनीच्या कापूस जिनिंगला लागलेल्या आगीत 20 कोटींपेक्षा जास्त नुकसान झाल्याची माहिती मिळत आहे. रविवारी दुपारी अचानक जिनिंगला आग लागली होती. या आगीने काही वेळातच उग्र रूप धारण केले. दरम्यान शॉर्ट सर्किटमुळे आग लागलाचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला आहे. अग्निशमन दलाच्या 11 बंबांच्या सहाय्याने ही आग नियंत्रणात आणण्यात यश मिळाले आहे.
हेही वाचा - कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या तयारीसाठी आराखडा सादर करावा - पालकमंत्री सुनिल केदार
जिनिंगमध्ये दैनंदिन काम सुरू असताना दुपारच्या सुमारास अचानक आग लागल्याची घटना रविवारी घडली होती. काही क्षणांतच रौद्ररुप धारण केलेल्या आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशमन दलाच्या 11 बंबांची मदत घेण्यात आली. यासाठी हिंगणघाट, वर्धा, देवळी, पुलगाव, पांढरकवडा वाणी येथूनही बंब बोलाविण्यात आले होते. आगीत 450 टन सरकी, आणि 7 हजार बेल्स(कापसाच्या गठाण) यासह जिनिग प्रोसेसिंग युनिटची संपूर्ण मशिनरी जळून खाक झाली आहे. यात सुमारे 20 कोटींपेक्षा जास्त नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. रात्री उशीरा आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. त्यानंतरही कुलिंग प्रोसेस करण्याचे काम चाललेले आहे.
वडनेर परिसरात येणाऱ्या शेतकऱ्यांना कापूस विकण्यासाठी होत असलेली अडचण लक्षात घेऊन गिमाटेक्स कंपनीने मागील काही वर्षांपूर्वी कापूस जिनिंग सुरू केली. याच जिनिंगवर दररोज मोठ्या प्रमाणात कापूस खरेदी होते. या सिजनमध्येही हजारो क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली. येथेच कापसाच्या जिनिंगवर प्रक्रिया करून गाठी तयार केल्या जातात.
हेही वाचा - जेनेटिक कंपनीमुळे विदर्भातील औषधी उद्योगांना प्रोत्साहन मिळण्यास मदत - पालकमंत्री केदार