वर्धा - राज्यातील 33 व्या पक्षीमित्र संमेलनाला सुरूवात होणार आहे. यासाठी सर्वच भागातून पक्षी प्रेमी सहभाग घेणार आहे. तर येथील बहार फाऊंडेशनच्या पक्षीमित्रांनी पर्यावरणाशी केलेली मैत्री जोपासत सायकल सफरीची निवड केली. यासाठी महाराष्ट्र पक्षीमित्र संघटनेचे विदर्भ समन्वयक दिलीप वीरखडे, बहारचे अध्यक्ष प्रा. किशोर वानखडे, सदस्य दर्शन दुधाने आणि दीपक गुढेकर असे या 4 पक्षीमित्रांचे नाव आहे. हे चौघे पक्षी अभ्यासक शनिवारी सायकल वारीसाठी शिवाजी चौकातून रवाना झाले आहे.
या सफरीला वर्ध्यातून सुरूवात होऊन कोकणात ही सफर समाप्त होणार आहे. हे पक्षीमित्र सायकलने तब्बल 800 किलोमीटरचा हा प्रवास करणार आहेत. वर्धा ते रायगड जिल्ह्याच्या अलिबाग तालुक्यातील रेवदंडापर्यंत हा प्रवास असणार आहे. पक्षीमित्र संघटना आणि अमेझिंग नेचर क्लबने आयोजित केलेल्या पक्षी संमेलनात सहभाग घेण्यासाठी हा घेण्यासाठी ही सफर असणार आहेत. मागील अनेक वर्षांपासून या संमेलनात सायकलनेच सहभागी होण्याची परंपरा बहार फाऊंडेशनच्या पक्षीमित्रांनी यावर्षीही कायम ठेवली. पुढील 8 दिवस दररोज 100 किमी याप्रमाणे रेवदंडाला 11 जानेवारी पर्यत हा प्रवास चालणार आहे. प्रवासादरम्यान लागणाऱ्या शहरातून जाताना हे पक्षीमित्र नागरिकांशी संवाद साधणार आहेत. तसेच पर्यावरण आणि पक्षी संवर्धनाचा संदेश देणार आहेत.
हेही वाचा - शेतकऱ्यांचं शिवारच मोकळं पडलं तर शिवथाळीमध्ये अन्न आणणार कोठून? राजू शेट्टींचा सवाल
या सायकल यात्रेला निरोप शुभेच्छा देण्यासाठी जिल्ह्याचे मानद वन्यजीव रक्षक संजय इंगळे तिगावकर, सायकलपटू विनोद सामक, बहार नेचर फाऊंडेशनचे सचिव राहुल तेलरांधे, आदी उपस्थित होते.