वर्धा - देशाला १५ ऑगस्ट १९४७ ला स्वातंत्र्य मिळाले. मात्र, या स्वातंत्र्यापूर्वीच १९४२ ला वर्धा जिल्ह्यातील आष्टी शहीद हे गाव एका दिवसासाठी स्वतंत्र झाले होते. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी गावातील ६ तरुणांनी बलिदान दिले. त्याचवेळी ब्रिटिशांवर हल्ला करत हे आष्टी गाव एक दिवसासाठी स्वतंत्र झाले होते.
महात्मा गांधींनी १९४२ ला 'चले-जाव'चा नारा दिला होता. ब्रिटिश सरकारच्या दडपशाही विरोधात आवाज उठवला होता. त्यावेळी चंद्रपूर जिल्ह्यातील चिमुर, अमरावती जिल्ह्यातील यावली, बेनोडा तर वर्धा जिल्ह्यातील आष्टी ही गावे पेटून उठली होती. नागरिकांनी १६ ऑगस्टला नागपंचमीच्या दिवशी गावातून शांतता फेरी काढली. आजूबाजूच्या गावातील लोकांचा जमाव वाढत गेला. ब्रिटिश सरकारविरोधी घोषणा देत गावकरी ब्रिटिशांच्या पोलीस ठाण्यावर धडकले. लोकांची गर्दी पाहून ब्रिटिशांनी अमानुष गोळीबार केला. यामध्ये गोविंदराव मालपे धारातिर्थ झाले. त्यांचे या लढ्यातील पहिले बलिदान ठरले.
लोक रक्ताच्या थारोळ्यात पडलेले असतानाही गोळीबार सुरूच होता. गावकऱ्यांनी देखील त्याला न जुमानता 'पथ्थर सारे बॉम्ब बनेंगे' म्हणत दगड मारायला सुरुवात केली. बघता बघता या स्वातंत्र्य लढ्यात ६ जणांनी प्राणाची आहुती दिली. यामध्ये शहीद रशीद, शहीद खान नवाब, शहीद केशव श्रावण ढोंगे, शहीद उदेभान कुबडे, शहीद हिरालाल बिहारी, शहीद पंची धुर्वे धारातीर्थी पडले.
पेटून उठलेल्या गावकऱ्यांनी ब्रिटिश ठाणेदार मिश्रासह त्याच्या सहकाऱ्यांची हत्या केली. ब्रिटिश सरकारचा झेंडा उतरवून भारताचा तिरंगा फडकवला. त्याचवेळी आष्टी शहीद हे गाव एका दिवसासाठी स्वतंत्र झाले होते.
गावकऱ्यांनी दिलेल्या स्वातंत्र्य लढ्यानंतर ब्रिटिश सरकारने अनेकांना तुरुंगात टाकले. ६५ लोकांना जन्मठेप, तर १० जणांना फाशीची शिक्षा सुनावली.
'त्या' पोलीस ठाण्यात राष्ट्रीय हुतात्मा महाविद्यालय चालते -
पोलीस ठाणे परिसरात रक्तरंजित क्रांती करून तरुणांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली होती. त्याच पोलीस ठाण्याची वास्तू आजही कायम आहे. त्या ठिकाणी स्वातंत्र्य संग्राम सैनिकांनी सुरू केलेले राष्ट्रीय हुतात्मा महाविद्यालय चालवले जाते. मात्र, या शहिदांच्या भूमीत तरुणांना प्रेरणा देणारे राष्ट्रीय दर्जाचे स्मृती स्मारक उभे करावे, यासाठी शहीद पुत्र डॉ. अरविंद माले गेल्या १० वर्षांपासून झटत आहेत. मात्र, सरकारकडून अद्यापही मागणी पूर्ण झालेली नाही.