वर्धा - हिंगणघाट प्रकरणातील पीडितेचा मृत्यू सोमवारी 10 फेब्रुवारीला झाला. ही बातमी गावात पोहोचल्यानंतर स्थानिकांनी प्रचंड आक्रोश केला. अनेक लोक रस्त्यावर उतरले होते. हैदराबादकडे जाणारा राष्ट्रीय महामार्ग रोखून धरला होता. आरोपीला फाशी देण्याची मागणी करत अनेकांनी राग व्यक्त केला. एवढेच नव्हे, तर मृत तरुणीचे पार्थिव गावात आणल्यावर संतप्त स्थानिकांनी त्या रुग्णवाहिकेवरही दगडफेक केली. मात्र, समोरून दगडांचा वर्षाव होत असताना या रुग्णवाहिकेच्या चालकाकडे कोणाचेही लक्ष नव्हते. कठीण परिस्थितीतही त्याने ही रुग्णवाहिका घरापर्यंत व्यवस्थितरित्या पोहोचवली. याचे पोलीस प्रशासनाने कौतुक केले आहे. जयपाल वंजारी, असे या रुग्णवाहिका चालकाचे नाव आहे. दगडफेकीत पाच पोलीस कर्मचारीही जखमी झाले होते. मात्र, त्यात जयपाल यांचे कामही महत्वाचे होते, हे पोलीस प्रशासनाने रुग्णवाहिका चालक जयपाल यांचा सन्मान करत दाखवून दिले आहे.
10 फेब्रुवारीला पीडितेचा मृत्यू झाल्यानंतर स्थानिकांचा संताप अनावर झाला होता. अनेक महिलांनी रस्त्यावर उतरून आरोपीलासुद्धा तशाच वेदना देण्यात याव्यात, अशी मागणी केली. यावेळी अनेकांची वाहनेही अडवण्यात आली. दरम्यान, पीडितेचे पार्थिव घेऊन नागपूर येथून निघालेली रुग्णवाहिका दारोडा गावात पोहोचली. यानंतर अचानक दगडफेक सुरू झाली. यात रुग्णवाहिकेची पुढील काच फुटली. यावेळी गावातील सुज्ञ लोकांनी या दगडफेकीला विरोध केला आणि ते रुग्णवहिकेपुढे उभे झाले. यात विजय तिमांडे यांनी तर रुग्णवाहिकेवर येणारे दगड झेलण्याच्या प्रयत्नही केला. एका युवती देखील गावातील लोकांवर ओरडू लागली. यावेळी चाललेल्या गोंधळातून रुग्णवाहिका चालकाने परिस्थितीशी साम्य साधत आणि पोलीस सोबत आहेत या विश्वासावर रुग्णवाहिका पीडितेच्या घरापर्यंत पोहोचवली.
हेही वाचा - 'चंद्रकांत पाटलांना खुर्चीचा दगा, शिवसेनेचे नाव घेताच पडता-पडता वाचले'
याचदरम्यान हे दृश्य टीव्हीवर पाहिल्यानंतर चालक जयपाल यांच्या पत्नी अक्षरश: घाबरून गेल्या होत्या. मात्र, जयपाल यांच्यासोबत फोनवरून बोलणे झाल्यावर ते सुरक्षित असल्याची खात्री होताच त्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. तसेच जे झाले ते दु:खद असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली.
ही परिस्थिती हाताळताना माझा पोलिसांवर विश्वास असल्याने मला भीती नव्हती. उलट त्यांच्यावर असलेल्या विश्वासामुळे मला हिंमत मिळत होती. हे पार्थिव त्या तरुणीच्या घरापर्यंत पोहोचवणे हा एकच उद्देश्य होता. म्हणून दगडफेकीनंतरही मी वाहन चालवत होतो, अशी प्रतिक्रिया रुग्णवाहिका चालक जयपाल यांनी दिली आहे. तसेच पोलिसांनी दाखवलेली समयसुचकता कौतुकास्पद आहे आणि त्यांनी केलेला हा सन्मान माझ्यासाठी कौतुकाची थाप आहे. तसेच हा सन्मान नवी ऊर्जा देणारा ठरेल यात शंका नाही, असेही ते म्हणाले.
हेही वाचा - अनुराधा पाटील यांना यंदाचा विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार जाहीर