वर्धा - शहरातील बाजारपेठेत मास्कचा योग्य रीतीने वापर न करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. सणासुदीचा काळ पाहता बाजारात गर्दी वाढली आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रसार होण्याची शक्यताही वाढत आहे. गुरुवारी सायंकाळी नागरिकांवर कारवाई करत दंड आकारण्यात आला. पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर आणि उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे यांनी रस्त्यावर उतरत ही मोहीम राबवली आहे. या मोहिमेअंतर्गत एका तासात 100 लोकांना दंड आकारण्यात आला.
दिवाळी सारखा मोठा सण तोंडावर असताना बाजारात मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. या काळात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यासाठी गुरुवार सायंकाळपासून विशेष 'मिशन मास्क' मोहिमेला सुरवात करण्यात आली आहे. यावेळी पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर आणि उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे यांनी बाजारपेठेत फिरून मास्क न घालणाऱ्यांवर कारवाई केली.
मास्क'चा वापर गरजेचा..
सणासुदीच्या काळात गर्दी होणार आहे. त्यामुळे गर्दीत जाणे टाळावे. तसेच प्रशासनाच्या त्रिसूत्रीचा अवलंब करावा. नागरिकांनी घराबाहेर पडतांना मास्क घालावा. मास्क घातल्याने कोरोना संसर्ग रोखण्यास मदत होणार आहे. यासह सोशल डिस्टंस आणि हात स्वच्छ धुणे, हेही तितकेच महत्वाचे आहे. असे आवाहन प्रशासनामार्फत करण्यात आले आहे. तसेच, या मोहिमेतून नागरिकांसोबत संवाद साधून मास्क घालण्याचा संदेश देण्यात आला. पुढील तीन दिवस ही मोहीम राबवणार असल्याचेही उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे यांनी सांगितले.
शासकीय अधिकारी दिसताच मास्क नाकावर..
बाजारपेठेत अनेक जण हे मास्क-रुमाल घालून दिसले. मात्र, नाक-तोंड झाकून ठेवणे अपेक्षित असताना कोणाच्या कानाला तर कोणाच्या गळ्यात मास्क दिसून आला. यामुळे पोलिसांचा ताफा दिसताच अनेकांनी रुमाल तोंडावर घेतले. तर, काहींनी गळ्यातील मास्क वर करत दंडापासून बचाव केला.
दंडासाठी बाचाबाची..
या मोहिमेदरम्यान अनेक जण मास्क घालून नसताना काहींनी पथकातील कर्मचाऱ्यांशी मास्क घालून आहे, रुमाल बांधून आहे, यासह पैसे नाहीत. अशा अनेक कारणावरून बाचाबाची केल्याचे चित्रही बाजारपेठेत मोहिमेदरम्यान दिसून आले. यावर प्रशासनाने हे मोहीम दंड वसुलीची नाही तर लोकांनी बिनधास्त वागणे थांबवण्यासाठी असल्याचे सांगितले. त्यामुळे केवळ दंड नाही तर अनेकांना हात जोडूनही मास्क घालण्यासाठी आग्रह करण्यात आला.
या मोहिमेत पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर, उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे, तहसीलदार संजय नागतीळक, नगर परिषदेचे मुख्याधिकारी विपीन पालीवाल, ठाणेदार योगेश पारधी यांच्यासह अनेक महसूल, नगर परिषद आणि पोलीस प्रशासनाचे कर्मचारी अधिकारी सहभागी झाले होते.
हेही वाचा - वर्ध्यात कांद्याच्या ट्रकचा दिखावा करत दारू वाहतूक, १२ लाखाचा मुद्देमाल जप्त