वर्धा - नागपूर-अमरावती महामार्गावर तळेगाव लगतच्या सत्याग्रही घाटात वळणावर ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने मच्छी घेऊन जाणारा ट्रक पलटी झाला. ही घटना शनिवारी पहाटे पाच वाजताच्या सुमारास घडली. या अपघातात चालक आणि क्लिनर सुखरुप असून मत्स्यबीजांचा महामार्गावर घटनास्थळी सडा पाहायला मिळाला.
मालवाहू (डब्लूबी 25, के 3064) क्रमांकचा ट्रक मच्छी घेऊन कोलकात्यावरुन मुंबईला जात होता. शनिवारी पहाटे पाच वाजताच्या सुमारास उतार आणि वळणावर असताना संतुलन सुटले. यात ट्रक पलटी झाला. यात ट्रकमध्ये असलेले छोट्या मासोळ्याचा सडा महामार्गावर पडलेला पाहायला मिळाला. रस्त्यावर असलेल्या मासोळ्यामुळे वाहतुकीवर परिणाम झाला होता.
तळेगाव पोलिसांना माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. क्रेनच्या सहाय्याने ट्रक रोडच्या कडेला घेऊन वाहतूक सुरळीत केली. घटनेची नोंद तळेगाव पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.