वर्धा - कारंजा शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग 6 वर राजणी फाट्याजवळ जनावरांना घेऊन जाणारे वाहन उलटल्याची घटना घडली आहे. या घटनेत सहा जनावरे जखमी अवस्थेत आढळून आली असून वाहन चालक फरार झाला आहे. तसेच काही जनावरे सुद्धा पसार झाल्याची चर्चा आहे.
हे ही वाचा - मोहाडीमध्ये माय-लेकाला ट्रक्टरने चिरडले; आईचा मृत्यू, मुलगा जखमी
मंगळवारी सकाळी कारंजावरून अमरावतीच्या दिशेने अवैधरित्या जनावरे घेऊन जाणाऱ्या भरधाव मालवाहतूक गाडीचा अपघात झाला. राजणी फाट्याजवळ मालवाहतूक वाहनाचे चाक तुटल्याने गाडी विरुध्द दिशेने जाऊन उलटली. यावेळी या वाहनात जवळपास 11 जनावरे होती. त्यापैकी ६ जनावरे गंभीर जखमी झालेली आढळली. यामध्ये अन्य जनावरे त्या घटनास्थळावरुन पळून गेल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले.
हे ही वाचा - पालघरमध्ये कार अन् कंटेनरचा अपघात, २ जण गंभीर जखमी
या घटनेत वाहन चालक पसार झाला आहे. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून वाहन ताब्यात घेऊन जखमी जनावरांवर उपचार करण्यासाठी पशू वैद्यकीय अधिकरी यांना पाचारण केले. जखमी जनावरांवर उपचार करून पंचनामा करण्यात आला. जखमी जनावरांना गोशाळेत नेण्यात आले असून पुढील तपास कारंजा पोलीस करत आहे.