वर्धा - वर्ध्याच्या आर्वीतील कदम रुग्णालयातील बेकायदेशीर गर्भपात प्रकरणात ( Illegal Abortion Case Wardha ) शनिवारी सकाळपासून आरोग्य विभाग आणि पोलिस विभागाने दवाखान्यासह घराची झाडाझडती घेतली. यामध्ये सायंकाळच्या सुमारास रुग्णालयात आणखी धक्कादायक बाब समोर आली आहे. यात कदम रुग्णालयात शासकीय रुग्णालयांना मिळणाऱ्या औषध साठ्यातील गोळ्यांचा आणि आणि इंजेक्शनचा साठा पोलिसांनी जप्त केला ( Birth Control Pills Injections Found In Kadam Hospital Wardha ) आहे.
गर्भनिरोधक गोळ्या, गर्भाचा आकार कमी करणारे इंजेक्शन सापडले
या औषधीमध्ये गर्भनिरोधक माला - डी या गोळ्यांचा मोठा साठा पोलिसांच्या हाती लागला आहे. तसेच गर्भपात केल्यानंतर वाढलेल्या गर्भाचा आकार कमी करण्यासाठी दिले जाणारे इंजेक्शन मिळून आले आहे. महाराष्ट्र्र शासनाकडून पुरवला जाणारा औषधसाठा कदम हॉस्पिटलमध्ये पोहचला तरी कसा याचा शोध मात्र पोलिसांना घ्यावा लागणार आहे.
पती शासकीय रुग्णालयात कामाला
डॉ.रेखा कदम ( Dr Rekha Kadam ) यांना पोलिसांनी अटक करत न्यायालयीन कोठडीत पाठवले असताना त्यांचेही पती डॉ.नीरज कदम ( Dr Niraj Kadam ) यांचाही या प्रकरणात संबंध आहे का? आहे तर तो कशा पद्धतीने आहे हे मात्र अजून पोलीस विभागाकडून स्पष्ट झालेले नाही. डॉ. निरज कदम हे शासकीय उपजिल्हा रुग्णालयात ( Sub District Hospital Wardha ) अनेक वर्षांपासून कंत्राटी पद्धतीने कार्यरत आहेत. त्यामुळे या औषधसाठ्याचे कनेक्शन उपजिल्हा रुग्णालयाशी तर नाही ना? असे प्रश्न आता समोर येत आहेत.
काळवीटाची कातडी सापडली
या प्रकरणात पोलीस तपास यंत्रणेला मिळणारे साहित्य प्रकरणाला नवनवीन वळण देणारे ठरत आहे. यामध्ये दुपारच्या सुमारास पथकाने विविध नोंद वह्या जप्त केल्या आहेत. यासोबतच मादी काळवीटची कातळी मिळून आली होती. प्राथमिक माहितीनुसार वनविभागाने काळवीट असण्याची शक्यता वर्तवली असली तरी, फॉरेन्सिक अहवाल आल्यानंतरच कातडी किती जुनी आहे आणि ती नेमकी कोणत्या प्राण्याची आहे हे स्पष्ट होणार असल्याचे आर्वीचे वनपरिक्षेत्र अधिकारी नितीन जाधव यांनी सांगितले आहे.